दुबईत कामगारांच्या वस्तीत एका खोलीत २० जण; बुर्ज खलिफा सोडा, ‘ही’ वस्ती पाहिली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:44 IST2025-01-09T15:44:13+5:302025-01-09T15:44:43+5:30

मुंबईतील धारावी झोपडपट्टीत एका झोपडीत १५ ते २० जण वास्तव्य करतात हे सर्वश्रूत आहे

20 people live in a worker settlement in Dubai Have you seen 'this' settlement let alone the Burj Khalifa | दुबईत कामगारांच्या वस्तीत एका खोलीत २० जण; बुर्ज खलिफा सोडा, ‘ही’ वस्ती पाहिली का?

दुबईत कामगारांच्या वस्तीत एका खोलीत २० जण; बुर्ज खलिफा सोडा, ‘ही’ वस्ती पाहिली का?

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुंबईतील धारावी झोपडपट्टीत एका झोपडीत १५ ते २० जण वास्तव्य करतात हे सर्वश्रूत आहे. परंतु, दुबई व अन्य आखाती देशांतील कामगार वस्त्यांमध्ये फसवणूक करून नेलेल्या कामगारांनाही एका खोलीत २० जणांना राहायला भाग पाडल्याची उदाहरणे आहेत, अशी माहिती या देशात वास्तव्य करणाऱ्यांनी दिली.

नॉन रेसिडेंट इंडियन (एनआरआय) दिवस गुरुवारी असून एनआरआय म्हणजे धनाढ्य... विदेशी मोटार घेऊन फिरणारे व अलिशान व्हिलात वास्तव्य करणारे, अशी सार्वत्रिक भावना आहे. परंतु, भारतीय पासपोर्ट असलेल्या व १८० दिवसांपेक्षा अधिक काळ विदेशात वास्तव्य करणाऱ्या शेकडो एनआरआय यांना देशापेक्षा विदेशात कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते. 

भारतामधील बेरोजगारीचा गैरफायदा घेऊन काही एजंट विदेशातील नोकरीचे व तेथील वेतनाचे प्रलोभन दाखवून लोकांना फसवून विदेशात नेतात.

एका खोलीत २० जणांचे वास्तव्य

विदेशात गेल्यावर अनेकांचे पासपोर्ट काढून घेतले जातात. सांगितल्यापेक्षा भलतीच कामे करण्यास भाग पाडले जाते. तेथील कामगारांच्या वस्त्यांमध्ये एकेका खोलीत २० जणांना कोंबलेले असते. अशा छळछावण्यांविरुद्ध आवाज उठवला तर वेळप्रसंगी जीव घेतला जातो. दुबईत फिरायला गेलेले भारतीय बुर्ज खलिफा पाहतात. मात्र, तेथील कामगारांच्या वस्तीमधील भारतीयांचे हाल पाहत नाही. 

प्रवासी विमा उतरवणे बंधनकारक

  • केंद्र सरकारच्या विदेश मंत्रालयाने याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. पूर्व युरोप, पश्चिम आशियाई आणि मध्य आशियाई देश येथे नोकऱ्यांचे आमिष दाखवून लोकांची लक्षावधी रुपयांना फसवणूक करणाऱ्यांचे पेव फुटले असून लोकांना अशा दलालांपासून सावध राहिले पाहिजे, असे केंद्र सरकारने बजावले आहे. 
  • केंद्र सरकारच्या वेबसाइटवर विदेशात नोकऱ्या देणाऱ्या अधिकृत एजंटांची माहिती देणारी यादी उपलब्ध आहे. तुम्हाला नोकरीची ऑफर देणारी कंपनी त्या यादीत समाविष्ट आहे का, याची खातरजमा करूनच व्यवहार करा. 
  • इमिग्रेशन ॲक्ट १९८३ च्या तरतुदीनुसार ३० हजार रुपये शुल्क व १८ टक्के जीएसटी यापेक्षा जास्त रक्कम वसूल करून नोकरीची ऑफर जर कुणी करत असेल तर ती व्यक्ती तुमची फसवणूक करत आहे. 
  • विदेशात नोकरीला जाण्यापूर्वी तेथील कामाच्या व निवासाच्या ठिकाणाची माहिती एजंटाने देणे बंधनकारक आहे. विदेशात करायच्या कामाबाबत ओरिएंटेशन करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर दोन अथवा तीन वर्षांकरिता विदेशात जाणाऱ्यांचा १० लाखांचा प्रवासी भारतीय विमा उतरवणे बंधनकारक आहे.

Web Title: 20 people live in a worker settlement in Dubai Have you seen 'this' settlement let alone the Burj Khalifa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.