कोकण विभागातील २,७३८ रुग्णांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २५.८६ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:53 IST2025-08-01T11:52:30+5:302025-08-01T11:53:30+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

कोकण विभागातील २,७३८ रुग्णांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २५.८६ कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः कोकण विभागात मागील सात महिन्यांमध्ये २,७३८ रुग्णांना तब्बल २५ कोटी ८६ लाख ३७ हजार रुपयांची मदत दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ज्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा.
जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधीचा उपयोग खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती मुख्यमंत्री साहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
२० गंभीर आजारांसाठी मिळणार अर्थसाहाय्य
कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसाहाय्य दिले जाते.