Haji Ali Accident: मुंबईतून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तिघेजण हाजी अली येथील समुद्रात बुडाले. यातील दोघांचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आलं. स्थानिक मच्छिमार आणि पोलिसांच्या मदतीने तिघांनाही बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. वाचलेल्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पावसामुळे समुद्र खवळलेला असून लोकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
वरळीच्या हाजी अली समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीनजण वाहून गेल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण वाचला. संतोष विश्वेश्वर (५१) आणि कुणाल कोकाटे ( ४५) अशी मृतांची नवे आहेत. तर, संजय सरवणकर यांची प्रकृती स्थिर आहे. तिघे बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर मच्छीमारांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना वाचवले आणि उपचारासाठी नायर रुग्णालयात पाठवले. मात्र, दोघेजण मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. लोटस जेट्टी, हाजीअली येथे हे तिघे गेले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने तिघांना बाहेर काढल्यानंतर त्यांना ताबडतोब नायर रुग्णालयात नेण्यात आले.तिघांपैकी दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. एक व्यक्ती जिवंत होती आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती ताडदेव पोलिसांनी दिली. मृत नातेवाईकाच्या अस्थी विसर्जनासाठी तीन लोक समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले होते. यावेळी समुद्राच्या लाटांमध्ये तोल गेल्याने तिघेही वाहून गेले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, समुद्रात अचानक आलेल्या जोरदार लाटांमुळे तिघांचाही तोल गेला आणि ते खोल पाण्यात गेले.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या कुटुंबातील सदस्यांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना समुद्र किंवा पाणवठ्यांजवळ धार्मिक विधी करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हाजी अलीसारख्या सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा उपायांचा आढावा घेण्याचे आणि ते मजबूत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.