Join us  

1993 बॉम्बस्फोट प्रकरण;  7 सप्टेंबरला अबू सालेमसह इतर दोषींना सुनावण्यात येणार शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 4:36 PM

1993 साली मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला कुख्यात डॉन अबू सालेमसह इतर दाषींना 7 सप्टेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. टाडा कोर्टात शिक्षेची सुनावणी होणार आहे.

मुंबई, दि. 22 - 1993 साली मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला कुख्यात डॉन अबू सालेमसह इतर दाषींना 7 सप्टेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. टाडा कोर्टात शिक्षेची सुनावणी होणार आहे. 1993 साली मुंबईला हादरवून सोडणा-या बॉम्बस्फोट खटल्यातील सहा आरोपींना शुक्रवारी टाडा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. 

मुंबई शहराला हादरवून सोडणा-या 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान, फिरोझ अब्दुल राशिद खान यांना दोषी ठरवले होते. गुन्हेगारी कट रचणे आणि दहशतवादी कारवायांसाठी सालेमला न्यायालयाने दोषी ठरवण्यात आले होते. शस्त्रास्त्र कायद्याखालीही न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने अब्दुल कय्यूमची सुटका केली. त्याची तात्काळ मुक्ततता करण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते.   

12 मार्च 1993 रोजी 13 ठाकाणी झालेल्या शक्तिशाली साखळी बॉम्बस्फोटात 257 जण ठार तर 713 जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाला 24 वर्ष उलटून गेली आहेत. साखळी बॉम्बस्फोट घडवूण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला. यामध्ये एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कयूम यांचा समावेश आहे. या सर्वांवर आरोप निश्चित केले असून ते दोषी आहेत की नाही, याचा निकाल विशेष टाडा न्यायालयाने पुढे ढकलला आहे. 

संबंधित बातम्या

गँगस्टर अबू सालेम पुन्हा बोहल्यावर चढण्यास उत्सुक

अबू सालेमला जन्मठेप द्या, सीबीआयची मागणी

अबू सालेमची युरोपियन कोर्टात धाव

साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी असून 100 आरोपींना टाडा न्यायालयाने दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावरील आरोपांनुसार सुनावली आहे. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत.

सालेमने गुजरातला जाऊन नऊ एके-56 रायफल्स आणि 100 ग्रेनेडस घेतले. जानेवारी 1993 मध्ये अभिनेता संजय दत्त, झैबुनीसा काझीच्या घरी ही शस्त्रास्त्र उतरवण्यात आली होती. अनिस इब्राहिमच्या इशा-यावरुन ही शस्त्रास्त्रे या दोघांकडे ठेवण्यात आली होती. अबू सालेमला त्याच्या कृत्यासाठी फाशीची शिक्षा होऊ शकते पण पोर्तुगालकडून फाशीची शिक्षा न देण्याच्या अटीवर त्याचे प्रत्यर्पण झाले आहे. हवाला ऑपरेटर राहिलेल्या ताहीर मर्चंटलाही न्यायालयाने कट रचल्या प्रकरणी दोषी धरले. हल्ल्यासाठी ज्यांना प्रशिक्षित करण्यात आले त्यांच्यासाठी मर्चंटच्या दुबईमधील घराचा वापर झाल्याचे न्यायालयाने आपल्या निकाल वाचनात सांगितले होते.  न्यायालयाने कट रचल्या प्रकरणी मुस्तफा डोसाला दोषी ठरवले आहे. कट रचण्यासाठी दुबईत झालेल्या बैठकीला मुस्तफा त्याचा भाऊ मोहम्मद डोसा आणि दाऊद इब्राहिमसह उपस्थित होता असे न्यायाधीशांनी सांगितले. शस्त्रास्त्र उतरवण्यासाठी मुस्तफा डोसाने मदत केल्याचेही सिद्ध झाले आहे.कोर्टामध्ये सर्व आरोपी त्यांच्यासाठी खास बनवण्यात आलेल्या बेंचवर शेवटच्या रांगेत बसले होते. निकालापूर्वी डोसाने आपण तणावामध्ये असल्याचे सांगितले होते.  

टॅग्स :दहशतवादमुंबई हायकोर्टन्यायालय