डेंजरस आकसा बीचवर बुडणाऱ्या १९ जणांना जीवरक्षकांनी वाचवले
By मनोहर कुंभेजकर | Updated: June 18, 2023 21:14 IST2023-06-18T21:13:36+5:302023-06-18T21:14:46+5:30
येथील ७ जीवरक्षकांच्या बहादुरीचे कौतूक होत आहे, तर पावसाळ्यात बीच पर्यटकांसाठी बंद ठेवून बीचवर पोलिस तैनात करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

डेंजरस आकसा बीचवर बुडणाऱ्या १९ जणांना जीवरक्षकांनी वाचवले
मुंबई- मालाड पश्चिम येथील आकसा बीचची डेंजरस आकसा बीच अशी ओळख आहे. जुहू बीचवर गेल्या सोमवारी ५ पैकी सांताक्रूझ वाकोला येथील ४ मुले बुडण्याची घटना ताजी असतांनाच, आज दुपारी ४.४५ ते सायंकाळी ६.४५ पर्यंत डेंजरस आकसा बीचवर बुडणाऱ्या १९ जणांना येथील सात जीवरक्षकांनी वाचवले. अन्यथा दि,८ जून २००० रोजी मालाड पूर्व येथील आकसा बीच मध्ये १२ मुले बुडाली होती,ती घटना घडली असती अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
येथील ७ जीवरक्षकांच्या या बहादुरीचे कौतूक होत आहे.तर आता पावसाळ्यात बीच पर्यटकांसाठी बंद ठेवून बीच वर पोलिस तैनात करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आज समुद्र खवळलेला होता.मुंबईतील इतर बीच पर्यटकांसाठी बंद असतांना,येथील बीच बंद करा ही जीवरक्षकांची सकाळ पासून ते करत असलेली विनंती धुडकावून लावत आकसा चौकीवरील बीच पोलिसांनी आकसा बीच पर्यटकांसाठी खुला ठेवला.आम्हाला बीच पर्यटकांसाठी खुला ठेवा अशी वरून ऑर्डर आहे अशी उत्तरे पोलिसांनी दिली अशी माहिती येथील जीवरक्षकांनी दिली.
आज दुपारी तीन पर्यंत येथील जीवरक्षकांनी डोळ्यात तेल घालत पर्यटकांना समुद्रात उतरू दिले नाही.मात्र दुपारी ३ नंतर येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली. परिस्थिती हात बाहेर जाऊ लागली. आणि आकसा बीच वर सायंकाळी ४.४५ ते ६.४५ पर्यंत बुडत असलेले तब्बल १९ पर्यटक व लहान मुले येथील जीवरक्षक १)एकनाथ तांडेल,२) भरत मानकर ३) समीर कोळी ४) मिलन पाटील ५) प्रसाद बाजी ६) विराज भानजी ७) जयेश कोळी या सात जीवरक्षकांनी आपला जीव धोक्यात घालून त्यांचे जीव वाचवत त्यांना सुखरूप बाहेर काढले.
पाण्यातून बाहेर काढलेल्या पर्यटकांची नावे
१-उमेर शेख वय 23. मुंबई
२- नीता शेख वय 24. मुंबई
३-काशीफा शेख वय 12. मुंबई
४- फेज शेख,. वय 13. मुंबई
५- लायबा शेख वय. 22. मुंबई
६- शेख शब्बीर खान वय 24. मुंबई.
७- दानिश डीलोमो. वय 20., मुंबई
८-आवेश इम्तियाज अन्सारी. वय 20. मुंबई.
९) परवेज संकुल अहमद अन्सारी.वय.20 मुंबई मालाड
१०) नीता संकुल अहमद खातूम. वय 21. मुंबई मालाड
या प्रक्रियेत वाचवलेले उर्वरित ९ पर्यटक पळून गेले,त्यामुळे त्यांची नावे समजली नाही अशी माहिती जीवरक्षकांनी लोकमतला दिली.दिवसभर येथे पोलिस नव्हते. अखेर कंट्रोलला कळल्यावर सायंकाळी येथे पोलिस आल्याची माहिती त्यांनी दिली.