Join us  

१९ टक्के नोकरदारांनी काढली भविष्य निर्वाह निधीतली रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 5:20 PM

पाच महिन्यांत १ कोटी ११ लाख क्लेम मंजूर; अर्जदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ

मुंबई : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लागू झालेल्या लाँकडाऊमुळे नोकरदारांवर कोसळलेल्या आर्थिक संकटाची धार कमी करण्यासाठी भविष्य निर्वाह निधीतली काही रक्कम काढण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. गेल्या पाच महिन्यांत पीएफ कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या सुमारे ५ कोटी ८१ लाखांपैकी १ कोटी १२ लाख नोकरदारांनी भविष्यासाठी राखून ठेवलेली जवळपास २० हजार कोटींची रक्कम काढली आहे. गेल्या दोन महिन्यांत तर दररोज एक लाखांपेक्षा जास्त कर्मचा-यांना कोविड आणि नाँन कोविड अशा दोन्ही श्रेणीतले क्लेम अदा केले जात आहेत.  

भविष्य निर्वाह निधी योजनेचे सदस्य असलेल्या नोंदणीकृत कर्मचा-यांना आपले तीन महिन्यांचे मुळ वेतन आणि महागाई भत्याच्या एकत्रित रकमेच्या ७५ टक्के रक्कम म्हणजे जवळपास दीड महिन्यांच्या वेतना एवढी रक्कम खात्यातून काढण्याची मुभा (कोविड क्लेम) केंद्र सरकारने दिली आहे. त्याशिवाय घरबांधणी, घर दुरूस्ती , मुलांचे शिक्षण, औषधोपचार आदी सहा ते सात करणांसाठीसुध्दा  नोकरदारांना पीएफमधिल पैसे काढण्याची मुभा (नाँन कोविड क्लेम) पूर्वीपासूनच आहे. कोरोना संकटामुळे आर्थिक घडी विस्कटलेले नोकरदार या दोन्ही पर्यायांचा वापर करून निवृत्तिनंतरची तजवीज म्हणून ठेवलेली रक्कम काढत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यांत सरासरी १५ लाख ८२ हजार कर्मचारी या दोन्ही पर्यायांचा वापर करून पैसे काढत होते. गेल्या दोन महिन्यांत ते प्रमाण सरासरी २६ लाख ७१ हजारांवर पोहचले आहे. याचाच अर्थ दररोज जवळपास १ लाख कर्मचारी आपली भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढू लागले आहेत.  

३१ आँगस्टपर्यंत ईपीएफओ कार्यालयाने १ कोट १२ लाख क्लेम मंजूर करून ती रक्कम अर्जदारांच्या बँक खात्यामध्ये जमा केली आहे. त्यात कोविडसाठी दिलेल्या विशेष पर्यायाचा वापर करून रक्कम काढणा-यांची संख्या सुमारे ५१ लाख आहे. तर, उर्वरित नोकरदारांनी परंपरागत पर्यायांचा वापर केला आहे. काही नोकरदारांनी दोन्ही पर्यायांचा वापर करून रक्कम काढल्याची माहिती या विभागातील अधिका-यांनी दिली. अनेक नोकरदारांनी नोक-या गमावल्या असून बहुतांश जणांचे वेतन कमी झाले आहे. काही जणांना काम केल्यानंतरही वेतन मिळत नाही. त्यामुळे दिवसागणीक या क्लेमची संख्या वाढत असल्याची माहिती या विभागातील अधिका-यांनी दिली आहे. 

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस