Bhandup Accident: मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने बुधवारी विश्रांती घेतली आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला झोडपून काढलं होतं. अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. दुसरीकडे भांडूपमध्ये खुल्या विजेच्या तारांमुळे एका १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. महावितरणचा प्रवाह असलेल्या वायरचा स्पर्श झाल्याने मुलाला विजेचा जबर धक्का लागला आणि त्याचा मृत्यू झाला. महत्त्वाची बाब म्हणजे हा मुलगा कानात हेडफोन घालत चालत होता. लोकांनी त्याला ओरडून बाजूने जाण्याचा इशारा केला. मात्र हेडफोनमुळे त्याला ऐकू न गेल्याने त्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
पावसात कानात हेडफोन घालून प्रवास करणं एका १७ वर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतलं आहे. भांडूपच्या पन्नालाल कंम्पाऊंड परिसरामध्ये विजेचा धक्का लागून दीपक पिल्ले याचा मृत्यू झाला. दीपक हा एल बी एस मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने निघाला होता. परंतु रस्त्यात महावितरणाची हाय टेन्शन वायर खुली होती. त्या मधून झालेल्या विजेचा प्रवाहामुळे शॉक लागून दिपकचा मृत्यू झाला. दीपकने कानात हेडफोन घातले होते. आजूबाजूच्या लोकांना त्याला बाजूने देण्यासाठी ओरडून आवाज देखील दिला. मात्र हेडफोनमुळे ऐकून न आल्याने तो वायरच्या संपर्कात आला आणि त्याला जबर विजेचा धक्का बसला.
"त्या रस्त्यावरुन अनेक लोक जात होते, आम्ही त्यांना सावध करत होता. आम्ही दीपकला आवाज दिला, पण कानात हेडफोन असल्यामुळे त्याला ऐकू गेला नाही. आम्ही धावत त्याच्या मागे गेले. पण तो त्याआधीच वायरच्या संपर्कात आला होता आणि खाली पडला," असं प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
महाराष्ट्रात ४ दिवसात २१ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर सुरूच आहे. पाऊस आणि पुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात ४ दिवसांत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू होता पण १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १० जण जखमी झाले आहेत.