Join us

चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:30 IST

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीला १६ जिवंत सापांची तस्करी करताना अटक करण्यात आली आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीला १६ जिवंत सापांची तस्करी करताना अटक करण्यात आली आहे. गुडमॅन लिनफोर्ड लिओ असे या आरोपीचे नाव असून, मुंबई कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला ग्रीन चॅनेलवर रंगेहाथ पकडले.

विमानतळावरून प्रवास करणाऱ्या लिओच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने विमानतळ अधिकाऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्याने सुरक्षा तपासणीतून सुटण्यासाठी अनोखा जुगाड वापरला होता, तरीही ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडताना कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता, सर्वांनाच धक्का बसला.

बॅगेत सापडल्या १६ सापांच्या प्रजातीमुंबई कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लिओच्या बॅगेत १६ जिवंत साप सापडले. यात ५ होंडुरन मिल्क साप (Honduran Milk Snake), २ गार्टर साप (Garter Snake), २ केनियन सँड बोआ (Kenyan Sand Boa), १ बँडेड कॅलिफोर्निया किंग साप (Banded California King Snake), ५ राइनोसिरस रॅट साप (Rhinoceros Rat Snake) आणि १ अल्बिनो रॅट साप (Albino Rat Snake) या प्रजातींचा समावेश होता. वन्यजीव नियंत्रण ब्युरोने देखील याला दुजोरा दिला आहे.

लिओच्या बॅगेत पांढऱ्या कपड्यांचे १५ पाऊच होते, ज्यात साप ठेवून धाग्याने आणि रबराच्या बँडने बांधले होते. तसेच, विमानतळावरच्या तपासणीतून सुटण्यासाठी लिओने हे साप चॉकलेटच्या डब्यात आणि जुन्या कपड्यांमध्ये लपवले होते. लिओ ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला तिथेच रोखले.

पैशांसाठी केली अवैध तस्करीकस्टम अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लिओच्या बॅगेत सापडलेले १६ साप हे 'CITES' (Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora) च्या यादीत समाविष्ट नाहीत. मात्र, कोणत्याही कागदपत्रांशिवाय सापांची तस्करी करणे अवैध मानले जाते. या सापांच्या तस्करीसाठी आपल्याला लाखो रुपये मिळालयाचे लिओने कबूल केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :विमानतळमुंबईगुन्हेगारी