गेल्या सहा वर्षांत एसटीचे १५ हजार ७६७ अपघात, ३७८ कोटी रुपयांची अपघातग्रस्तांना मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:51 IST2026-03-16T13:50:26+5:302026-03-16T13:51:11+5:30
एसटी बसच्या अपघातांमध्ये काही प्रवासी गंभीर जखमी झाले, तर काहींना जीव गमवावा लागला. महामंडळाच्या आकडेवारीनुसार अपघातांमध्ये १९ हजार ५६४ जण जखमी झाले, तर २ हजार चारजणांचा मृत्यू झाला.

गेल्या सहा वर्षांत एसटीचे १५ हजार ७६७ अपघात, ३७८ कोटी रुपयांची अपघातग्रस्तांना मदत
महेश कोले -
मुंबई : एप्रिल २०१८ ते एप्रिल २०२४ या सहा वर्षांच्या कालावधीत राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसचे १५ हजार ७६७ अपघात झाले. यामधील अपघातग्रस्तांना नुकसानभरपाई म्हणून महामंडळाकडून ३७८ कोटी नऊ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
एसटी बसच्या अपघातांमध्ये काही प्रवासी गंभीर जखमी झाले, तर काहींना जीव गमवावा लागला. महामंडळाच्या आकडेवारीनुसार अपघातांमध्ये १९ हजार ५६४ जण जखमी झाले, तर २ हजार चारजणांचा मृत्यू झाला.
अपघातग्रस्त आणि त्यांच्या नातेवाइकांना नियमांनुसार नुकसानभरपाई देण्यात येते. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या ज्येष्ठ मुलगा किंवा अविवाहित ज्येष्ठ मुलगी यांना नुकसानभरपाई देण्याचे धोरण स्वीकारणारे एसटी महामंडळ हे भारतातील पहिलेच महामंडळ असल्याचा दावा महामंडळाने केला.
एसटीचा एक रुपयांचा विमा
प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत एसटी महामंडळाकडून तिकिटाच्या दरामधील १ रुपया विम्यासाठी राखून ठेवला जातो. या रकमेच्या माध्यमातून एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा विमा उतरविला जातो.
अपघाती नुकसानभरपाईसंदर्भातील प्रकरणे न्यायालयात दीर्घकाळ प्रलंबित राहू नयेत यासाठी लोकन्यायालयाच्या माध्यमातून तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्याची पद्धत १९८५ पासून सुरू करण्यात आली.