एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 05:28 IST2025-10-15T05:28:20+5:302025-10-15T05:28:45+5:30
दोन दिवसांत उत्तर द्यावे लागणार, परराज्यातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र मिळवून प्रवेश प्रक्रियेत अर्ज सादर केल्याच्या तक्रारी सीईटी सेलकडे आल्या होत्या.

एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या सुरू असलेल्या तिसऱ्या फेरीसाठी नोंदणी केलेल्या १५२ विद्यार्थ्यांनी चुकीची कागदपत्रे सादर केल्याचे समोर आले आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी डोमीसाईल प्रमाणपत्र चुकीचे दिले असून, आता सीईटी सेलने अशा विद्यार्थ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना मूळ कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास या तिसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेतून त्यांना वगळण्यात येणार आहे.
परराज्यातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र मिळवून प्रवेश प्रक्रियेत अर्ज सादर केल्याच्या तक्रारी सीईटी सेलकडे आल्या होत्या. त्यानंतर सेलने तिसऱ्या फेरीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली.
दरम्यान, सीईटी सेलने तिसऱ्या फेरीची अस्थायी गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर नवीन इच्छुक विद्यार्थ्यांनीही नव्याने प्रवेश अर्ज भरला आहे. या विद्यार्थ्यांच्या कागदपत्राबाबत सीईटी कक्षाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावेळी १५२ विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली कागदपत्रे चुकीची असल्याचे आढळून आले. कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्यासाठी १६ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजेपर्यंत वेळ दिली आहे.
कागदपत्रांत कोणत्या त्रुटी?
या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या डोमीसाईल प्रमाणपत्रावर अन्य नावे असणे, राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राच्या फॉरमॅटमध्ये अथवा त्या अक्षरांप्रमाणे प्रमाणपत्र नसणे, तसेच प्रमाणपत्राचा अर्धाच भाग दिसणे अशा पद्धतीच्या त्रुटी आढळून आल्या आहेत.