१५१ पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले; महामुंबईतील २६ जणांचा समावेश, राज्यातील काही जण संपर्काबाहेर; कुटुंबीय चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:36 IST2025-08-08T11:36:29+5:302025-08-08T11:36:59+5:30

संपर्क होत नसलेल्यांमध्ये चारकोप कांदिवली - ६, मुंबई उपनगर - ६, वसई - ६  टिटवाळा - २, सोलापूर - ४, अहिल्यानगर - १, नाशिक - ४, मालेगाव - ३ या पर्यटकांचा समावेश आहे...

151 tourists stranded in Uttarakhand; 26 people from Greater Mumbai included, some in the state out of contact; Families worried | १५१ पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले; महामुंबईतील २६ जणांचा समावेश, राज्यातील काही जण संपर्काबाहेर; कुटुंबीय चिंतेत

१५१ पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले; महामुंबईतील २६ जणांचा समावेश, राज्यातील काही जण संपर्काबाहेर; कुटुंबीय चिंतेत

मुंबई : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील १५१ पर्यटक अडकले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. त्यांपैकी २६ जण मुंबई, ठाणे, वसईतील असल्याचे समाेर आले आहे. या एकूण पर्यटकांपैकी १२० जणांशी संपर्क झाला असून, ते आयटीबीपी कॅॅम्पमध्ये सुरक्षित आहेत. 

संपर्क होऊ न शकलेल्या राज्यातील पर्यटकांना शोधण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद बर्धन यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. ढगाळ वातावरणामुळे मोबाइल नेटवर्क आणि बॅटरी चार्जिंग नसल्याने त्यांचा संपर्क होत नाही. संपर्क झाल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याची ग्वाही बर्धन यांनी दिली आहे.

यांच्याशी संपर्क नाही
संपर्क होत नसलेल्यांमध्ये चारकोप कांदिवली - ६, मुंबई उपनगर - ६, वसई - ६  टिटवाळा - २, सोलापूर - ४, अहिल्यानगर - १, नाशिक - ४, मालेगाव - ३ या पर्यटकांचा समावेश आहे.

महाजन उत्तराखंडमध्ये
राज्यातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्याची मोहीम राज्य सरकारने हाती घेतली आहे. यासाठी मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडला गेले आहेत. राज्य शासनाने मंत्रालयात एक नियंत्रण कक्षही स्थापन केला आहे.

नातेवाइकांना आवाहन
मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्य आपत्ती कक्षातून पर्यटकांबाबत आढावा घेतला.  राज्य सरकार उत्तराखंडमधील यंत्रणेशी सातत्याने संपर्कात असून, महाराष्ट्रातील पर्यटकांच्या नातेवाइकांनी काळजी करू नये, असे आवाहन राजेश कुमार यांनी केले. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात असून, चर्चा करून पर्यटकांना रेल्वे किंवा विमानाने आणण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ठाण्याचे पर्यटक सुखरूप
दुर्घटनेमध्ये ठाणे जिल्ह्यातील पाच पर्यटकांचा समावेश असून, ते सर्व सुखरूप असल्याचे ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाने स्पष्ट केले. शंकर देवराम दिघे, वत्सल देवराम दिघे आणि स्नेहा शंकर दिघे (सर्व रा. टिटवाळा), विश्वंभरन पिशराेडी, श्रीदेवी विश्वंभरन पिशराेडी अशी ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांची नावे  आहेत.

महाराष्ट्र राज्य–आपत्कालीन कार्य केंद्र
संपर्क क्रमांक : ९३२१५ ८७१४३
०२२-२२०२७९९० / ०२२-२२७९४२२९
डॉ. भालचंद्र चव्हाण, संचालक, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, महाराष्ट्र - ९४०४६९५३५६ 

उत्तराखंड राज्य–आपत्कालीन कार्य केंद्र
संपर्क क्रमांक : ०१३५-२७१०३३४, ८२१८८६७००५ 
जिल्हा – उत्तरकाशी
प्रशांत आर्य, जिल्हाधिकारी, उत्तर काशी : ९४१२०७७५०० / ८४७७९५३५०० 
मेहेरबान सिंग, समन्वय अधिकारी : ९४१२९२५६६६
मुक्ता मिश्रा, सहायक जिल्हाधिकारी, उत्तर काशी : ७५७९४७४७४०
जय पनवार, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, उत्तराखंड : ९४५६३२६६४१
सचिन कुरवे, समन्वय अधिकारी : ८४४५६३२३१९.

Web Title: 151 tourists stranded in Uttarakhand; 26 people from Greater Mumbai included, some in the state out of contact; Families worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.