Join us  

पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 4:45 PM

अल्पवयीन मुलानं समोरुन येणाऱ्या बाइकला धडक दिली आणि यात ३२ वर्षीय बाइकस्वाराचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या भायखळा येथे ही घटना घडली आहे. 

मुंबई-

पुण्यात विशाल अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलानं आलिशान पोर्श कारने दोघांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही एका अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे बाइक चालवत एकाचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलानं समोरुन येणाऱ्या बाइकला धडक दिली आणि यात ३२ वर्षीय बाइकस्वाराचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या भायखळा येथे ही घटना घडली आहे.

माझगाव येथील नेसबीट ब्रिजवर समोरासमोर बाइकची धडक लागून झालेल्या अपघातात इरफान नवाबअली शेख या ३२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. आरोपी बाइकस्वार १५ वर्षांचा असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. 

अल्पवयीन मुलाला बाइक चालवण्यात दिल्यामुळे आणि अपघातात एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपी मुलासह त्याच्या वडिलांवर जे.जे.मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यात मुलाच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. 

इरफान शेख हा माझगाव परिसरात त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो. त्याचा ऑनलाइन कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. गुरुवारी सकाळी तो त्याच्या बाइकवरुन नेसबिट ब्रिजवरुन जात होता. यावेळी समोरुन येणाऱ्या बाइकस्वाराने त्याच्या बाइकला धडक दिली. त्यात इरफानसह १५ वर्षांचा बाइकस्वार मुलगा जखमी झाला. दोघांनाही जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं इरफानला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. 

टॅग्स :बाईकअपघात