Join us
Daily Top 2Weekly Top 5

२९ महानगरपालिकांसाठी १५,९३१ उमेदवार रिंगणात; मुंबईत सर्वाधिक १७००, इचलकरंजीमध्ये सर्वात कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 05:15 IST

अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी वा बहुरंगी लढती होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत २,८६९ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी १५,९३१ उमेदवार रिंगणात आहेत. अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी वा बहुरंगी लढती होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने अंतिमत: किती उमेदवार रिंगणात आहेत, याची अधिकृत आकडेवारी शनिवारी दिली. 

मुंबईमध्ये २२७ जागांसाठी १७०० उमेदवार रिंगणात असून, सर्वात कमी म्हणजे २३० उमेदवार इचलकरंजीमध्ये आहेत. तेथे ६५ जागांसाठी मतदान होत आहे. इचलकरंजी आणि जालना महापालिकेत पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. 

मुंबईनंतर उमेदवारांचा हजाराचा आकडा पार केला आहे तो पुणे शहराने. तेथे १६५ जागांच्या निवडणुकीत ९६८ उमेदवारांनी माघार घेऊनदेखील ११६६ उमेदवार भाग्य आजमावत आहेत. उपराजधानी नागपुरात १५१ नगरसेवक निवडून दिले जाणार असून, तेथे ९९३ उमेदवार लढत आहेत. 

 

२९ महापालिकांसाठी एकूण ३३,४२७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील २४,७७१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. ८,८४० उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले.  माघार घेतलेल्या उमेदवारांबाबत छत्रपती संभाजीनगरने मुंबईला मागे टाकले आहे. मुंबईत ४५३ उमेदवारांनी माघार घेतली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ५५२ जणांनी माघार घेतली. तथापि, राज्यात सर्वाधिक उमेदवारांनी माघार घेतली ती पुण्यात. तेथे तब्बल ९६८ जणांनी माघार घेतली.

बिनविरोधांचे काय होणार?

राज्यात ७० नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यावरून सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या बिनविरोध निवडी निवडणूक आयोगाने कायम ठेवल्या तर निवडणूक पार पडल्यानंतर निवडणूक याचिकेच्या संदर्भात दाद मागता येईल.

कायदेविषयक जाणकारांच्या मते माघारीसाठी दबाव आणला गेला हे पुराव्याने सिद्ध करणे तेवढे सोपे नाही. शिवाय नगरसेवकपदाची मुदत संपण्याच्या आधी न्यायालयाचा निकाल न येणे ही खात्रीशीर शक्यता असून ती पूर्वानुभवावर आधरित आहे. मात्र, बिनविरोध निवडीबाबत आयोगाची भूमिका ही सर्वात महत्त्वाची असेल.

महापालिकानिहाय प्रभाग, सदस्य व अंतिम उमेदवार संख्या

अ.क्र.महानगरपालिकेचे नावप्रभाग संख्यासदस्य संख्याअंतिम उमेदवार
बृहन्मुंबई२२७२२७१७००
छत्रपती संभाजीनगर२९११५८५९
नवी मुंबई२८१११४९९
वसई–विरार२९११५५४७
कोल्हापूर२०८१३२७
कल्याण–डोंबिवली३११२२४८९
ठाणे३३१३१६५६
उल्हासनगर२०७८४३२
नाशिक३११२२७३५
१०पुणे४११६५११६६
११पिंपरी–चिंचवड३२१२८६९२
१२सोलापूर२६१०२५६४
१३अकोला२०८०४६९
१४अमरावती२२८७६६१
१५नागपूर३८१५१९९३
१६चंद्रपूर१७६६४५१
१७लातूर१८७०३५९
१८परभणी१६६५४११
१९भिवंडी–निजामपूर२३९०४३९
२०मालेगाव२१८४३०१
२१पनवेल२०७८२५५
२२मीरा–भाईंदर२४९५४३५
२३नांदेड–वाघाळा२०८१४९१
२४सांगली–मिरज–कुपवाड२०७८३८१
२५जळगाव१९७५३३३
२६धुळे१९७४३२०
२७अहिल्यानगर१७६८२८३
२८इचलकरंजी१६६५२३०
२९जालना१६६५४५३
     
 एकूण८९३२८६९१५९३१

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : 15,931 Candidates in Fray for 29 Municipal Corporations' Elections

Web Summary : 15,931 candidates are contesting for 2,869 councillor posts across 29 Maharashtra municipal corporations on January 15th. Mumbai sees highest participation with 1700 candidates, while Ichalkaranji has the fewest with 230. Pune and Nagpur also have significant numbers of candidates in the fray.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६नगर पालिकामहाराष्ट्रराजकारण