गॅस सिलिंडर स्फोटामुळे चाळ कोसळून १५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 09:25 IST2025-07-19T09:25:01+5:302025-07-19T09:25:23+5:30

दोघांची प्रकृती गंभीर; केईएममध्ये उपचार सुरू

15 injured as rice field collapses due to gas cylinder explosion | गॅस सिलिंडर स्फोटामुळे चाळ कोसळून १५ जखमी

गॅस सिलिंडर स्फोटामुळे चाळ कोसळून १५ जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे येथील भारतनगरामध्ये शुक्रवारी नमाज कमिटी मशिदीलगतची एक चाळ सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोसळली. गॅस सिलिंडर गळतीमुळे स्फोट होऊन ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील घरे कोसळून १५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. दोघांनाही केईएम रूग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

भारतनगरमधील तीन मजली चाळ क्रमांक ३७ येथे झालेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत मदतकार्य हाती घेतले, तसेच पोलिस, महापालिकेच्या विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेच्या वेळी बहुतांश रहिवासी गाढ झोपेत होते, तर काही जण शुक्रवारच्या पहिल्या नमाजासाठी शेजारील मशिदीकडे जात होते. काही जण घरातच आपल्या मुलांना शाळेसाठी तयार करत होते. कोसळलेल्या चाळीच्या ढिगाऱ्याखाली  सुरुवातीला आठ ते दहा जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. अग्निशमन दलाच्या बचावकार्याच्या दरम्यान जखमींची संख्या वाढून आता १५ वर पोहचली आहे. दुर्घटना घडलेला परिसर चिंचोळा असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना शेजारील भागातून तेथे प्रवेश करावा लागला. यामुळे बचाव कार्यात अडचणी येत होते. मात्र, जवानांनी १५ जणांना तातडीने ढिगाऱ्याखालून बाहेर काढले.

१३ जणांची प्रकृती स्थिर
सुरुवातीला जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर, त्यांना केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींना ढिगाऱ्याखालून तत्काळ बाहेर काढल्याने ते बचावले, अशा प्रतिक्रिया काहींनी दिल्या. 
बहुतांश जखमींची उपचारानंतर प्रकृती स्थिर आहे. यातील दोन जण ५० टक्के  भाजल्यामुळे त्यांना थेट केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 

Web Title: 15 injured as rice field collapses due to gas cylinder explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई