प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 08:30 IST2026-01-12T08:28:11+5:302026-01-12T08:30:06+5:30
आरटीओला परवानगीपोटी २.८४ लाखांचा महसूल

प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर भारतीय नेत्यांसह उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशातील प्रचार वाहनेही मोठ्या संख्येन मुंबईत दाखल झाली आहेत. आतापर्यंत १४२ वाहने परराज्यांतून आली असून त्यांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या वाहनांच्या परवानगी शुल्काच्या माध्यमातून २ लाख ८४ हजार रुपयांचा महसूल मिळाल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तर भारतातील राज्यांमधून प्रचार वाहने मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. यामध्ये खुल्या जीप, मिनी ट्रक आणि एलईडी प्रचार व्हॅनचा समावेश आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी या वापरण्यात येत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
काय आहे प्रक्रिया?
आरटीओ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, राज्यात बाहेरून येणाऱ्या सर्व वाहनांचे वैध परवाने, इन्शुरन्स आणि फिटनेस प्रमाणपत्रे तपासली जातात. राजकीय पक्षाने त्यांच्या प्रचार वाहनांची माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी. वाहनाच्या परवान्यासाठी आरटीओ २ हजार रुपये शुल्क आकारते.