Mumbai on High Alert: राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह असताना सार्वजनिक गणपती विसर्जनापूर्वी मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर आत्मघातकी हल्ल्याची धमकी आल्याने खळबळ माजली आहे. मुंबई शहरात ३४ वाहनांमध्ये जवळपास ४०० किलो आरडिएक्स प्लांट केले असून १ कोटीहून अधिक लोकांना मारण्याची ही योजना असल्याचं मेसेजमध्ये उल्लेख आहे.
या मेसेजनुसार, लष्कर ए जिहादीचे १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आहेत असा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने दावा केला आहे. सप्टेंबर ३ तारखेला संध्याकाळी मुंबई वाहतूक पोलिसांच्या सोशल मिडिया व्हॉट्सअप नंबरवर हा मेसेज आला होता. या मेसेजची तात्काळ दखल घेत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ही बाब कळवली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी मेसेज पाठवणाऱ्याची चौकशी सुरू केली आहे. या धमकीमुळे पोलीस सतर्क झाले आहेत. ठिकठिकाणी नाका तपासणी आणि कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
ऑगस्टमध्येही अशाच प्रकारे वरळीतील एका हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता. हॉटेलच्या ३ व्हिआयपी रूमध्ये ब्लास्ट होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. जुलैमध्येही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी देणारा ईमेल यंत्रणेला मिळाला होता. या धमकीमुळे बीएसई इमारतील काही काळ दहशतीचं वातावण पसरले होते. सुरक्षा जवानांनी दलाल स्ट्रीट परिसर आणि संपूर्ण दक्षिण मुंबईत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली.
दरम्यान, मुंबईत सध्या गणेशोत्सव सुरू आहे. मोठ्या प्रमाणात गणेशभक्त विसर्जनाच्या दिवशी रस्त्यांवर, चौपाटीवर गर्दी करतात. गणेश विसर्जनाच्या एक दिवस आधी मिळालेल्या या धमकीच्या मेसेजमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासोबतच धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता मुंबई वाहतूक पोलिसांना आलेला मेसेजची खातरजमा पोलिसांकडून केली जात आहे.