बीकेसी येथे पुलाचा भाग कोसळून १४ जखमी; पूल दुर्घटनेची चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 05:31 AM2021-09-18T05:31:45+5:302021-09-18T05:32:19+5:30

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि मुंबई अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते.

14 injured in BKC bridge collapse pdc | बीकेसी येथे पुलाचा भाग कोसळून १४ जखमी; पूल दुर्घटनेची चौकशी होणार

बीकेसी येथे पुलाचा भाग कोसळून १४ जखमी; पूल दुर्घटनेची चौकशी होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने वांद्रे पूर्वेकडील बीकेसीमधील एमटीएनएल जंक्शन येथे हाती घेण्यात आलेल्या पुलाच्या कामाचा काही भाग शुक्रवारी पहाटे ४ वाजता कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४ कामगार जखमी झाले. या १४ जखमींना व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अपघातग्रस्तांची प्रकृती स्थिर आहे. अनिल सिंग, अरविंद सिंग, अझहर अली, मुस्तफ अली, रियाझुद्दिन, मोतलाब अली, रियाझू अली, श्रावण, अतिश अली, रलीस अली, अझीझ उल हक, परवेझ, अकबर अली, श्रीमंद अशी जखमींची नावे आहेत.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि मुंबई अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. शिवाय वेगाने मदत कार्य हाती घेण्यात आले होते. पडलेला भाग उचलण्याचे काम सुरू असतानाच जखमींना वेगाने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुपारचे दोन वाजले तरी येथील गर्डर उचलण्यात आला नव्हता.

या रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असते. शिवाय प्रकल्पाचे काम सुरू असल्याने ठिकाणी बॅरिकेड करण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता आणखी अरुंद झाला आहे. अरुंद रस्ता आणि ऐनवेळी झालेली कोंडी या दोन घटकांमुळे अपघाताची शक्यता आहे. प्राधिकरण आणि वाहतूक पोलीस यांनी येथे योग्य ते नियोजन करावे, असे म्हणणे वाहन चालक मांडत आहेत.

बीकेसी आणि कुर्ला उड्डाणपुलाला जोडणाऱ्या कामादरम्यान झालेली दुर्घटना सुरक्षा मानक आणि नियमांचे उल्लंघन असून, यात झालेला अक्षम्य निष्काळजीपणा लक्षात घेता संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.

पूल दुर्घटनेची चौकशी होणार - एकनाथ शिंदे

वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळल्याची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी संयुक्तपणे चौकशी करतील, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनास्थळाला भेट दिली. ही दुर्घटना पूर्णपणे दुर्दैवी असून या दुर्घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. ही दुर्घटना गर्डरचे बेअरिंग आणि नट बोल्ट यांच्यात त्रुटी राहिल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरीही त्याची पूर्ण चौकशी करून त्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल, असे शिंदे म्हणाले.

सखोल चौकशी, मग कारवाई – श्रीनिवास

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, कामगार कायद्याप्रमाणे जखमी कामगारांना जी मदत मिळणे अपेक्षित आहे, ती सगळी मदत केली जाईल. या घटनेची माहिती मिळताच प्राधिकरणाचे आयुक्त श्रीनिवास यांनीदेखील घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, बीकेसी येथे घडलेल्या प्रकरणात सखोल चौकशी केली जाईल. या चौकशीचा अहवाल तयार केला जाईल आणि आवश्यकतेनुसार या प्रकरणात कारवाईदेखील केली जाईल. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या दुर्घटनेत जखमी झालेल्या १४ पैकी १३ कामगारांना उपचार करून व्ही. एन. देसाई रुग्णालयातून सोडून देण्यात आले आहे. एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत; तर दुसरीकडे कंत्राटदार जे. कुमार याबाबत प्राधिकरणाकडून काहीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
 

Web Title: 14 injured in BKC bridge collapse pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Mumbaiमुंबई