Join us

डॉ. आंबेडकर पुतळ्यासाठी १३९५ टन धातूची खरेदी; पादपीठ इमारतीचे २० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 16:01 IST

जागतिक दर्जाच्या या संपूर्ण स्मारकाचे काम २०२१मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते.

मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या कामासाठी १,३९५ टन धातूची गरज भासणार आहे. त्याची खरेदी करण्यात आली आहे. आता कारखान्यात पुतळ्याच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. सद्यःस्थितीत पादपीठ इमारत आणि पुतळ्याचे २० टक्के काम पूर्ण झाले आहे. जागतिक दर्जाच्या या संपूर्ण स्मारकाचे काम २०२१मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते.

इंदू मिलच्या १२ एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ४५० फूट उंचीच्या स्मारकाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) उभारणी केली जात आहे. यात १०० फूट उंचीची स्मारकाच्या पादपीठाची इमारत उभारली जाणार आहे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे. सध्या पुतळ्याच्या निर्मितीचे काम शिल्पकार राम सुतार यांच्या कारखान्यात सुरू आहे.

कामाला विलंब... 

या प्रकल्पाच्या कामाला फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरुवात झाली होती. त्यावेळच्या नियोजनानुसार पुढील ३६ महिने म्हणजेच फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, प्रकल्पाच्या कामाला विलंब झाला आहे. आता कामाला मुदतवाढ देण्यात आली असून, हे काम डिसेंबर २०२५पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही प्रकल्पाच्या कामाने अपेक्षित गती पकडलेली नाही.

थर्माकॉलचे मॉडेल

धातूच्या पुतळ्याची उभारणी करण्यापूर्वी पुतळ्याचे थर्माकॉलचे मॉडेल साकारले जात आहे. सध्या पुतळ्याच्या पायथ्यापासून २३० फुटांपर्यंतच्या उंचीचे थर्माकॉलच्या मॉडेलचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या थर्माकॉलच्या मॉडेलचे काम पूर्ण झाल्यावर त्यावरून धातूचा पुतळा साकारला जाणार आहे. या पुतळ्याची स्मारकाच्या जागी आणून जोडणी केली जाणार आहे. सध्या कारखान्यात १५५ मेट्रिक टन बेसप्लेटचे फॅब्रिकेशन आणि उभारणी पूर्ण झाली आहे. प्रकल्पातील सहायक इमारतीचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. 

टॅग्स :मुंबईडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती