समृद्धीलगतच्या आमने ग्रोथ सेंटरमध्ये १३० गावांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:10 IST2025-10-09T10:10:35+5:302025-10-09T10:10:46+5:30
भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात वेअरहाऊस उभे राहिले आहेत. या वेअरहाऊसच्या माध्यमातून मुंबई महानगराला मालाचा पुरवठा होतो.

समृद्धीलगतच्या आमने ग्रोथ सेंटरमध्ये १३० गावांचा समावेश
- अमर शैला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समृद्धी महामार्गाची सुरुवात होणाऱ्या ठाण्यातील आमने येथे उभारण्यात येणाऱ्या आमने ग्रोथ सेंटरमध्ये नव्याने १३० गावांचा समावेश करण्यास राज्य सरकारने मंगळवारी मान्यता दिली. त्यानुसार आमने ग्रोथ सेंटरमध्ये एकूण १७६ गावांचा समावेश झाला असून ४८३ चौरस किमी क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे.
भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात वेअरहाऊस उभे राहिले आहेत. या वेअरहाऊसच्या माध्यमातून मुंबई महानगराला मालाचा पुरवठा होतो. मात्र, या भागाचा सुनियोजित विकास झाला नसल्याचे चित्र आहे. त्यातून परिसराचे बकालीकरण वाढले आहे. त्यामुळे या भागाच्या नियोजनबद्ध विकासाची जबाबदारी एमएसआरडीसीवर सोपविण्यात आली आहे.
राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि भिवंडी तालुक्यातील ४६ गावांसाठी सप्टेंबर २०२४ मध्ये एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी १०९ चौरस किमी क्षेत्रासाठी एमएसआरडीसीची नियुक्ती करण्यात आली होती. आता यात आनगाव सापे विकास केंद्रातील १३० गावांच्या ३७४ चौ. किमी क्षेत्राचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भिवंडी १४८ व कल्याणमधील २८ गावांसाठी एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण म्हणून काम करेल.
प्रस्तावित वाढवण बंदरातून मालवाहतूक
या भागात समृद्धी महामार्गासह, प्रस्तावित विरार अलिबाग बहुद्देशीय मार्ग, दिल्ली- मुंबई महामार्ग हे या परिसरातून जातात, तसेच एनएच ३ आणि एसएच ८३ हे मार्गही या भागात आहेत, तसेच भविष्यात या भागातून जेएनपीटीसह वाढवण येथील प्रस्तावित बंदराला मालाची वाहतूक होणे अपेक्षित आहे. त्यातून परिसरात लॉजिस्टिक हब आणि वेअरहाऊसचा सुनियोजित विकास होणे आवश्यक आहे.
ग्रोथ केंद्रांमध्ये या गोष्टी असणार
आमने भागातील १७६ गावांमध्ये उभारण्यात येणाऱ्या ग्रोथ सेंटरमध्ये इंडस्ट्रिअल पार्क, लॉजिस्टिक हब, टेक्सटाइल पार्क, फार्मा अँड बायटेक पार्क, फूड प्रोसेसिंग पार्क, इनोव्हेशन पार्क, मेडिसिटी, स्पोर्ट्स अँड रिक्रीएशन हब, हेल्थकेअर क्लस्टर, ॲग्रीकल्चर हब, होलसेल ट्रेड सेंटर आदींचा समावेश असेल. त्याचबरोबर रहिवासी आणि व्यावसायिक इमारती, थिम बेस पार्क यांचाही समावेश असेल. त्याचबरोबर या भागाचा ट्रान्सिट ओरिएंटेड डेव्हल्पमेंट पद्धतीने विकास साधला जाणार आहे.