डीमार्टमधील लिफ्टमध्ये अडकलेल्या १३ जणांची सुटका, अग्निशमन दलाकडून मोहिम फत्ते
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 14:26 IST2021-01-18T14:24:26+5:302021-01-18T14:26:14+5:30
लिफ् मध्ये १३ जण अडकून पडल्याने खळबळ उडाली . कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले पण लिफ्ट काही सुरु झाली नाही . शेवटी रात्री पावणे आठच्या सुमारास अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले

डीमार्टमधील लिफ्टमध्ये अडकलेल्या १३ जणांची सुटका, अग्निशमन दलाकडून मोहिम फत्ते
मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या डीमार्ट मधील लिफ्ट अचानक बंद पडल्याने त्यात १३ ग्राहक सुमारे दोन तास अडकून पडले होत . अग्निशमन दलाने लिफ्टच्या वरील पत्रा कापून आतील लोकांची सुटका केली. डीमार्ट मधील इमारतीत असलेल्या अंतर्गत लिफ्ट मधून रविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास पहिल्या व तळ मजल्याच्या मध्येच अचानक लिफ्ट बंद पडली . लिफ्ट बंद पडल्याने आतील १३ जण अडकून पडले. अडकून पडलेल्यात ३ व ११ वर्षाची मुलं देखील होती .
लिफ्ट मध्ये १३ जण अडकून पडल्याने खळबळ उडाली . कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले पण लिफ्ट काही सुरु झाली नाही . शेवटी रात्री पावणे आठच्या सुमारास अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. भाईंदरच्या अग्निशमन दलाने घटना स्थळी धाव घेतली. लिफ्टच्या वरील पत्रा कापण्याची गरज अग्निशमन दलाने व्यक्त केली असता आधी लिफ्ट सुरु करण्याचे प्रयत्न करू अशी भूमिका व्यवस्थापनाने घेतली . त्यामुळे जवानांनी अडकलेल्याना हवा मिळत राहावी ह्याची व्यवस्था केली . व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना यश न आल्याने शेवटी सव्वा नऊच्या सुमारास अग्निशमन दलाने लिफ्टच्या वरील पत्रा कापला. पत्रा लागू नये म्हणून त्यास जाड कांबळ लावले. वरून दोन जवान लिफ्ट मध्ये उतरले व लहान शिडी लावून अडकलेल्या १३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले.