पश्चिम रेल्वेवर १३ तासांचा ब्लॉक; १०० वर्षांपेक्षा जुन्या पुलाचे गर्डर बदलण्याचे होणार काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 21:34 IST2025-02-07T21:33:39+5:302025-02-07T21:34:15+5:30
शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी ११ या कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर १३ तासांचा ब्लॉक; १०० वर्षांपेक्षा जुन्या पुलाचे गर्डर बदलण्याचे होणार काम
महेश कोले
मुंबई: पश्चिम रेल्वेच्यामुंबई सेंट्रल आणि ग्रांटरोड स्टेशनदरम्यान असलेल्या पूल क्रमांक ५ चे जुने स्टील गर्डर बदलण्यासाठी १३ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी ११ या कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई सेंट्रल स्टेशन जवळ असलेल्या १८६२ साली उभारण्यात आलेल्या जुन्या नाल्यावरील पुलाचे (कल्वर्ट) स्टीलचे गर्डर बदलून त्याजागी सिमेंट कॉंक्रिटचे (आरसीसी) गर्डर उभारण्यात येणार आहेत. या पुलावर १९६४ साली स्टीलचे गर्डर उभारण्यात आले होते त्याजागी आता आरसीसी गर्डर उभारण्यात येणार आहेत. या भागातील सर्व ५ मार्गिकांवर १२ मीटर लांबीचे २४ आरसीसी स्लॅब उभारण्यात येणार आहेत. हे काम टप्प्या टप्प्याने करण्यात येणार असून मार्च महिन्यापर्यंत स्टीलचे सर्व गर्डर सिमेंटच्या स्लॅबमध्ये बदलण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर असे आणखी १०० वर्षांपेक्षा अधिक जुने ३ पूल असून त्यांचे देखील स्टीलचे गर्डर देखील बदलण्यात येणार आहेत.
असा असेल ब्लॉक आणि त्याचे परिणाम
शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी ११ या कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावर घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात येणार असून काही गाड्या दादर आणि वांद्रे स्थानकामध्ये शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे शनिवारी ३१ आणि रविवारी ७२ उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार आहेत.
या पुलांचे स्टील गर्डर बदलणार
पश्चिम रेल्वे मार्गावर १०० वर्षांपेक्षा जुने अंधेरी पूल क्रमांक ४०, खार सबवे पूल क्रमांक ३१ आणि बोरिवली पूल क्रमांक ६१ हे ३ पूल असून त्यांचे देखील गार्डर २०२५ च्या अखेरपर्यंत बदलण्याचे नियोजित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.