विद्यार्थी १.२० लाख अन् प्रश्नपत्रिका ८० हजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:16 IST2025-12-25T10:15:49+5:302025-12-25T10:16:13+5:30
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्रकल्प बालवाडीपासून चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतो.

विद्यार्थी १.२० लाख अन् प्रश्नपत्रिका ८० हजार
- घन:श्याम सोनार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेच्या शाळांमध्ये पायाभूत साक्षरता चाचणीत १.२० लाख विद्यार्थ्यांसाठी केवळ ८० हजार प्रश्नपत्रिका आल्याने गोंधळ निर्माण झाला; मात्र उर्वरित विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका फोटोकॉपी करून दिल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्रकल्प बालवाडीपासून चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतो. या प्रकल्पासाठी महापालिकेने अदानी फाउंडेशनशी करार केला आहे. मात्र शनिवारी झालेल्या चाचणी परीक्षेसाठी शिक्षण विभागाने पूर्वप्राथमिक व प्राथमिक विद्यार्थ्यांच्या संख्येइतक्या प्रश्नपत्रिका दिल्या नाहीत, असा आरोप म्युनिसिपल समर्थ कामगार संघटनेने केला.
काही शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार विभाग निरीक्षक व प्रशासकीय शाळा अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर प्रश्नपत्रिकांची फोटोकॉपी त्याच्या प्रती विद्यार्थ्यांना वितरित करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे नाईलाजाने शिक्षकांना स्वखर्चाने प्रश्नपत्रिका झेरॉक्स कराव्या लागल्या, असा आरोप करण्यात आला.
प्रकल्पाचे उद्दिष्ट
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्रकल्पाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, आकलन तसेच मूलभूत गणिती संकल्पना भक्कम करणे हा आहे.
लहान वयातच भाषा आणि गणितातील पायाभूत कौशल्ये विकसित करून पुढील शिक्षणासाठी सक्षम विद्यार्थी घडवणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
चाचणी परीक्षेसाठी फक्त
८० हजारच प्रश्नपत्रिका दिल्या. त्यामुळे शिक्षकांना त्या झेरॉक्स कराव्या लागल्या.
- ऋषिकांत घोसाळकर, चिटणीस, मुन्सिपल समर्थ कामगार संघटना
पालिकेच्या शिक्षण विभागानेच राहिलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांच्या फोटोकॉपी करून दिल्या. शिक्षकांना खर्च करावा लागलेला नाही.
- सुजाता खरे, शिक्षणाधिकारी महापालिका