धारावीमध्येच पुनर्वसनासाठी १ हजार १७८ घरे ठरली पात्र; बहुसंख्य रहिवाशांना मिळणार लाभ : काहींच्या कागदपत्रांची पडताळणी अद्याप अपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 11:05 IST2025-12-13T11:04:21+5:302025-12-13T11:05:10+5:30
डीआरपी अंतिम परिशिष्ट-२’ मधील आकडेवारीनुसार एकूण तीन हजार ५१८ पैकी फक्त ७५ घरे (अंदाजे केवळ २ टक्के घरे) अपात्र घोषित केली आहेत.

धारावीमध्येच पुनर्वसनासाठी १ हजार १७८ घरे ठरली पात्र; बहुसंख्य रहिवाशांना मिळणार लाभ : काहींच्या कागदपत्रांची पडताळणी अद्याप अपूर्ण
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत (डीआरपी) पात्र आणि अपात्रतेवरून रान उठले असतानाच तीन हजार ५१८ घरांपैकी दोन हजार ९९ घरे (५७ टक्के) गृहनिर्माण लाभांसाठी पात्र असून, त्यापैकी एक हजार १७८ घरे (३३ टक्के) ‘इन-सिटू’ म्हणजे धारावीतच पुनर्वसनासाठी पात्र ठरली आहेत, अशी माहिती ‘डीआरपी’कडून देण्यात आली.
‘डीआरपी अंतिम परिशिष्ट-२’ मधील आकडेवारीनुसार एकूण तीन हजार ५१८ पैकी फक्त ७५ घरे (अंदाजे केवळ २ टक्के घरे) अपात्र घोषित केली आहेत. धारावीतील बहुसंख्य रहिवासी विविध पात्रता श्रेणींमध्ये घरांच्या लाभासाठी पात्र आहेत, असे ही आकडेवारी दर्शवत असल्याचे ‘डीआरपी’चे म्हणणे आहे.
एकूण तीन हजार ५१८ घरांपैकी दोन हजार ९९ घरे (५७ टक्के) गृहनिर्माण लाभांसाठी पात्र आहेत. त्यापैकी एक हजार १७८ घरे (३३ टक्के) ‘इन-सिटू’ म्हणजे धारावीतच पुनर्वसनासाठी पात्र ठरली आहेत. शिवाय १,०७८ घरे (३०.६ टक्के) प्रलंबित असून, त्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत किंवा विविध शासकीय संस्थांकडून पडताळणी प्रक्रियेत आहेत.
तक्रारी निवारणासाठी चतु:स्तरीय यंत्रणा
अंतिम परिशिष्ट-२ प्रसिद्ध
झाल्यानंतरही प्रक्रिया संपत नाही. तक्रारींच्या निवारणासाठी चतु:स्तरीय यंत्रणा तयार केली आहे.
रहिवासी प्रथम अपील अधिकारी यांच्याकडे जाऊ शकतात. त्यानंतर समाधान न झाल्यास ते तक्रार निवारण समितीकडे जाऊ शकतात. ही समिती सर्वेक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी नसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे.
जलद गतीने निपटारा
पुढील स्तरावर अपील समिती आहे; जी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते. ही समिती ‘डीआरपी’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उत्तरदायी नाही. अंतिम स्तरावर ॲपेक्स ग्रिव्हन्स रिड्रेसल कमिटी आहे. ही विशेषतः ‘डीआरपी’शी संबंधित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेली अर्ध-न्यायिक संस्था आहे.
विविध सोयी-सुविधांचा समावेश
धारावीतील अपात्र नसलेल्या घरांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा पुनर्विचार केला जाईल, असे ‘डीआरपी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ३३० संरचना सार्वजनिक सोयी-सुविधांमध्ये जसे की शौचालये आदी ठिकाणी समाविष्ट आहेत.