अकरावीसाठी ११.५ लाख अर्ज; तक्रारींचा पाढा सुरूच, सीबीएसईच्या विद्यार्थ्याला अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:03 IST2025-06-04T11:53:51+5:302025-06-04T12:03:25+5:30
एकूण १७,००० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील २,००० तक्रारी प्रलंबित

अकरावीसाठी ११.५ लाख अर्ज; तक्रारींचा पाढा सुरूच, सीबीएसईच्या विद्यार्थ्याला अडचणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अकरावी प्रवेशात ३ जूनपर्यंत ११,५५,२०० विद्यार्थ्यांची नोंद झाली असून विद्यार्थ्यांना अजूनही तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. आतापर्यंत यासंदर्भात शिक्षण विभागाकडे एकूण १७,००० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील २,००० तक्रारी प्रलंबित आहेत. सर्व तक्रारी सोडविण्याचे काम सुरू असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
मुंबईमध्ये अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कर्जत येथे राहणाऱ्या अरहम ओसवाल याची नोंदणी झालेली नाही. त्याची नोंदणी आधीच झाल्याचे प्रणालीकडून दाखवले गेले. यात दोन वेगवेगळ्या वर्षांतील दोन विद्यार्थ्यांचा सीट नंबर सारखाच असल्याने ही तांत्रिक अडचण येत असल्याचे अरहमचे म्हणणे आहे.
सीबीएसईच्या विद्यार्थ्याला अडचणी
अर्ज करताना अधिकृत मोबाइलवर ओटीपी येणे अडचणीचे झाले आहे, अशी तक्रार कांदिवलीच्या मेहक राणा हिने केली. वरळी येथील शहानवाज शेख हा सीबीएसईचा विद्यार्थी असल्याने त्याला देखील अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
आजपर्यंत एकूण राज्यामध्ये १७,००० तक्रारी प्राप्त झालेल्या आहे, पैकी २,००० तक्रारी प्रलंबित आहेत. त्यांचा देखील निपटारा जलदगतीने सुरू आहे.
-श्रीराम पानझडे, सहसंचालक, माध्यमिक शिक्षण विभाग.