दादरमध्ये १.१४ कोटी, कुर्ल्यात ४० लाखांची रोकड जप्त; भरारी पथकांची कारवाई, आयकर विभागाकडून तपासणी सुरू
By मनीषा म्हात्रे | Updated: May 1, 2024 00:32 IST2024-05-01T00:32:13+5:302024-05-01T00:32:48+5:30
या दोन्ही प्रकरणी आयकर विभाग अधिक चौकशी करत आहे.

दादरमध्ये १.१४ कोटी, कुर्ल्यात ४० लाखांची रोकड जप्त; भरारी पथकांची कारवाई, आयकर विभागाकडून तपासणी सुरू
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकांनी गस्ती दरम्यान दादर आणि कुर्ला परिसरातून दीड कोटींची रोकड जप्त केली आहे. या दोन्ही प्रकरणी आयकर विभाग अधिक चौकशी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लालबागमधील बांधकाम आणि हॉटेल व्यवसायिक विपुल नागदा (४६) हे सोमवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास चालक आदित्य जावळे याला सोबत घेऊन त्यांच्या कारमधून माटुंगा येथील कार्यालयात जात होते. वडाळा विधानसभा भरारी पथकाचे कक्ष अधिकारी मंदार कोचरेकर यांच्या पथकाने दादर पूर्वेकडील शिंदेवाडी जंक्शनवर नाकाबंदी दरम्यान त्यांची कार अडवली. कारच्या तपासणीमध्ये चार वेगवेगळ्या बॅगांमध्ये भरलेली एक कोटी १४ लाख ३९ हजार ७०० रुपये रक्कम या भरारी पथकाला सापडली.
भरारी पथकाने नागदा आणि जावळे यांना रोख रकमेसह ताब्यात घेत भोईवाडा पोलीस ठाण्यात नेले. ताब्यात घेण्यात आलेली रक्कम ही निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक असल्याने याबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या कुर्ला विधानसभा मतदारसंघाच्या भरारी पथकाने मंगळवारी सकाळी पेस्तम सागर नाका परिसरात संशयास्पद ह्युंदाई क्रेटा कारची तपासणी केली. कारमध्ये एका बॅगेत ४० लाख रुपये रोख रक्कम होती. भरारी पथकाने कार चालक उजास पटेल याच्याकडे पैशांबाबत विचारणा केली असता त्याला योग्य माहिती देता आली नाही. अखेर, त्याला या रोख रकमेसह टिळक नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आयकर विभागाने रोकड जप्त करत चौकशी करत आहे.