Join us  

कर्तव्यावर हजर होण्यासाठी शिक्षकाचा ११०० किमी प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 7:51 PM

दुचाकीवर तब्ब्ल ३ दिवसांचा प्रवास करत  गोंदियावरून गाठली मुंबई 

 

मुंबई : पालिका प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना कामावर राजू होण्याचे आदेश दिले असून हे निर्देश महापालिका शिक्षण विभागातील शिक्षकांना ही लागू आहेत. काही दिवसांपूर्वीच महापालिका शिक्षण विभागाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर हजार राहण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार कर्तव्यावर रुजू होण्यासाठी विलेपार्लेच्या एका प्राथमिक शिक्षकाने गोंदिया ते मुंबई असा ११०० किलोमीटरचा प्रवास ३ दिवस करत बाईकने मुंबई गाठली आहे. आपल्याला कामावर रुजू होण्याचे निर्देश मिळाले आहेत मग आता ते कर्तव्य विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाचे असो किंवा कोविड - १९ च्या ड्युटीचे आपल्याला पार पाडायचे असल्याची प्रतिक्रिया या शिक्षकाने दिली आहे.मार्चमध्ये लॉकडाऊन घोषित केल्यानंतर सर्व शाळा बंद करण्यात आल्या आणि पहिली ते आठवीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या. मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देवेंद्र कुमार नंदेश्वर सारख्या अनेक शिक्षकांनी कुटुंबासह गावी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर ऑनलाईन शिक्षणाची नियोजन करताना आणि अनेक शाळांमध्ये कोविड - १९ च्या रुग्णांची सोय केलेली असताना सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी याना कामावर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनेक शिक्षकांनी या निर्णयाला विरोध दर्शविला असताना देवेंद्र कुमार मात्र ३ मे रोजी आपल्या गावाहून मुंबईला येण्याची इतर सोय नसल्याने आपली दुचाकी घेऊन निघाले. ११०० किलोमीटरचा ३ दिवसांचा प्रवास करत त्यांनी अखेर ५ मे रोजी मुंबई गाठली आणि आपल्या कामावर हजेरी लावली. मुंबईत परिस्थिती संकटाची असताना माझ्या कामावर जर माझी गरज आहे तर मला कामावर रुजू होणे माझे कर्तव्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते विलेपार्ले येथील प्राथमिक वर्गाचे शिक्षक असून सर्व विषय शिकवीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या पालिका प्रशासनातील अधिकारी निसार खान यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच सुरुवातीला त्यांच्या जेवणाची व्यवस्था करत कामाचे नंतर पाहू असे म्हणत त्यांची सोय केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अनेक शिक्षकांचा विरोध : शिक्षकांना आधीच विविध कामे देण्यात आली आहेत. आता महानगरपालिका शिक्षण विभाग कोविड -१९ ची ड्युटी आणि ऑनलाईन शिक्षणाची ड्युटी देऊन त्यांचा त्रास आणखीन वाढवीत आहे. मुंबई अद्याप रेड झोनमध्ये आहे असे असताना शाळा सुरु करण्याचे कोणतेही नियोजन अजून तरी तयार नाही. अनेक शिक्षक गावित असताना त्यांना असे तडकाफडकी बोलावणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी दिली आणि या कामाचा निषेध नोंदविला आहे.  

टॅग्स :शिक्षणमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस