ऑगस्ट महिन्यात मुंबईत १०,४५५ घरांची विक्री; सलग तिसऱ्या महिन्यांत दहा हजारांपेक्षा जास्त घरांची विक्री
By मनोज गडनीस | Updated: August 31, 2023 19:06 IST2023-08-31T19:06:10+5:302023-08-31T19:06:23+5:30
ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबईत शहरात एकूण १० हजार ४५५ प्रॉपर्टीज (निवासी आणि व्यावसायिक) विक्री झाली असून यापोटी सरकारच्या तिजोरीत ७७६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

ऑगस्ट महिन्यात मुंबईत १०,४५५ घरांची विक्री; सलग तिसऱ्या महिन्यांत दहा हजारांपेक्षा जास्त घरांची विक्री
मुंबई- ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबईत शहरात एकूण १० हजार ४५५ प्रॉपर्टीज (निवासी आणि व्यावसायिक) विक्री झाली असून यापोटी सरकारच्या तिजोरीत ७७६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. विशेष म्हणजे, जून, जुलै आणि आता ऑगस्ट अशा सलग तीन महिन्यात मुंबईत प्रत्येक महिन्याला १० हजारांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत मुंबईत एकूण ८२ हजार २६३ घरांची विक्री झाली असून या माध्यमातून सरकारला ७२४२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
आगामी काळात असलेल्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घरांच्या विक्रीचा आलेख वाढताना दिसेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, ऑगस्टमध्ये ज्या घरांची विक्री झाली आहे त्यामध्ये सर्वाधिक विक्री ही मोठ्या व आलीशान घरांची सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ८० लाख ते दीड कोटी रुपये किमतीच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण हे यंदा ४३ टक्के अधिक असून दीड कोटी ते अडीच कोटी रुपये किमतीच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण हे २७ टक्के अधिक आहे. अडीच कोटी रुपये व त्यावरील घरांच्या विक्रीचे प्रमाण हे २१ टक्के अधिक आहे.