मुंबईचं वैभव ठरलेल्या 'आर्ट डेको'ची शंभरी! खास फेस्टीव्हलचं आयोजन
By मोरेश्वर येरम | Updated: November 6, 2025 17:46 IST2025-11-06T17:43:35+5:302025-11-06T17:46:03+5:30
मुंबईतील गगनाला भिडणाऱ्या इमारतींची भव्यता पाहून आश्चर्यचकीत व्हायला होतं. पण मनात घर करतात त्या दक्षिण मुंबईतील छोटेखानी जुन्या इमारती.

मुंबईचं वैभव ठरलेल्या 'आर्ट डेको'ची शंभरी! खास फेस्टीव्हलचं आयोजन
मुंबईतील गगनाला भिडणाऱ्या इमारतींची भव्यता पाहून आश्चर्यचकीत व्हायला होतं. पण मनात घर करतात त्या दक्षिण मुंबईतील छोटेखानी जुन्या इमारती. मग त्या मरिनलाइन्स किनारपट्टीवरील एकाच उंचीच्या, समान रचनेच्या जणू ठिपक्यांच्या रांगोळीतील अगदी काटेकोर समान अंतरावरील सुबक ठिपके वाटावेत अशा इमारती असोत किंवा इरॉस थिएटर, लिबर्टी सिनेमा किंवा मग तारापोरवाला मत्स्यालय असो. या इमारतींच्या रेखीव बांधकामाला एक वेगळं महत्त्व आहे. पॅरिसच्या 'आर्ट डेको' शैलीची या इमारती साक्ष आहेत. याच आर्ट डेको शैलीला यंदा १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. याचं औचित्य साधून भायखळा येथील भाऊ दाजी लाड संग्रहालयात 'आर्ट डेको अलाइव्ह फेस्टीव्हल'चं आयोजन केलं गेलं आहे.
'आर्ट डेको लाइव्ह'च्या संस्थापक स्मिती कनोडिया, भाऊदाजी लाड संग्रहालयाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. तस्नीम मेहता यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. वैभवशाली संस्कृतीची ओळख सांगणारं हे 'आर्ट डेको फेस्टीव्हल' ६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मुंबईतील अशा आर्ट डेको शैलीतील बांधकामांची माहिती जाणून घेता येणार आहे. यासोबतच म्युझियम शो, आर्ट डेको वॉक, व्याख्यानमाला, सिनेमा टूर, चर्चगेट स्ट्रीट ब्लॉक पार्टी, टायपोग्राफी अशा विविध कार्यक्रमांचा समावेश यात आहे.
'आर्ट डेको' म्हणजे काय?
आर्ट डेको बांधकाम शैली मूळची लंडनच्या पॅरिसची असून १९२० सालची. रेखीव बांधकाम, भव्यतेपेक्षा सुबकेला प्राधान्य, गोलाकार सुबक सज्जे, हवेशीर खिडक्या आणि प्रत्येक इमारतीची काहीतरी वेगळी ओळख ठरावी असं बांधकाम यामुळे आर्ट डेको शैली सर्वांचं लक्ष वेधून घेत राहिली. आजच्या घडीला आर्ट डेको शैलीतील रचना 'मियामी'नंतर सर्वाधिक कुठे पाहायला मिळत असतील तर त्या मुंबईतच. दक्षिण मुंबईतील फोर्ट, दादर, माटुंगा आणि उपनगरात विलेपार्ले परिसरातही आर्ट डेको शैलीतील वास्तू पाहायला मिळतात. इतकंच नाही तर चर्चगेटच्या ओव्हल मैदानाभोवतालच्या आर्ट डेको शैलीतील इमारतींना युनोस्कोचा हेरिटेज दर्जा देखील प्राप्त झालेला आहे.
- अधिक माहितीसाठी 'आर्ट डेको अलाइव्ह' या इन्स्टाग्राम पेजला भेट देऊ शकता.