धारावीकरांचे १०० प्रश्न ! पुनर्विकासावरून खल : वरच्या मजल्यावरील घरांना क्रमांक कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:14 IST2025-07-25T13:14:35+5:302025-07-25T13:14:55+5:30
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने धारावीतील नागरिक हेल्पलाईन क्रमांकावर अनेक प्रश्नांचा भडिमार करीत आहे.

धारावीकरांचे १०० प्रश्न ! पुनर्विकासावरून खल : वरच्या मजल्यावरील घरांना क्रमांक कधी?
मुंबई :धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने धारावीतील नागरिक हेल्पलाईन क्रमांकावर अनेक प्रश्नांचा भडिमार करीत आहे. सर्वेक्षण केव्हा करणार? सर्वेक्षणासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? पात्रतेचे निकष कोणते? नवीन घरांचा ताबा कधी देणार? पुनर्विकासानंतर घर कुठे मिळणार? घराचे क्षेत्रफळ किती असेल? वरच्या मजल्यावरील घरांना क्रमांक कधी देणार यांसह सुमारे १०० प्रश्न धारावीकरांनी विचारले आहेत.
पुनर्विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लोक उत्सुक आहेत. प्रकल्पात सर्वांना घर दिले जाईल. त्यासाठी सुरुवातीपासून राबविलेले व्यक्तिकेंद्री पुनर्विकासाचे धोरण अखेरपर्यंत कायम राहील, असे धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून (डीआरपी) सांगण्यात आले.
आतापर्यंत ८७ हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, तर एक लाखापेक्षा जास्त घरांवर नंबर टाकण्यात आले आहेत. कुंभारवाड्यात सर्वेक्षणाला विरोध झाला होता. तेथील रहिवाशांची मानसिकता आता बदलत आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक रहिवासी सर्वेक्षणासाठी पुढे आले आहेत. तसेच १२० पेक्षा जास्त घरांवर नंबर टाकण्यात आले आहेत.
हेल्पलाईनवर कॉलचा भडीमार
स्थानिकांच्या शंकांचे निरसन कारणासाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर मोठ्या प्रमाणात कॉल्स येत आहेत. काही कारणास्तव सर्वेक्षणातून वगळलेले किंवा सहभागी न झालेले रहिवासी या प्रक्रियेत सहभागी होत आहेत.
स्थानिकांच्या सूचनांना मिळणार प्राधान्य
१३ कंपाउंड, कुंभारवाडा, खासगी जमिनीवरील काही घरे आणि इतर ठिकाणच्या काही रहिवाशांनी अद्याप सर्वेक्षणात सहभाग घेतलेला नाही. त्यांना माहिती देण्यात येत आहे. त्यानंतर प्रतिसाद वाढण्याची अपेक्षा आहे. स्थानिकांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी, त्यांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी हे काम पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे, असे धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या वतीने सांगण्यात आले.