संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मास्टर प्लॅनवर १०० हरकती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 10:35 IST2025-10-15T10:35:03+5:302025-10-15T10:35:13+5:30

पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, आदिवासी समाजाने आक्षेप नोंदवले  आहेत.

100 objections to the master plan of Sanjay Gandhi National Park | संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मास्टर प्लॅनवर १०० हरकती

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मास्टर प्लॅनवर १०० हरकती

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) परिसरातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रासाठी झोनल मास्टर प्लान तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 

मुंबई महापालिकेच्या आवाहनानुसार मुंबईकरांनी तब्बल १०० हरकती व सूचना नोंदवल्या आहेत. त्यावर आता पालिकेकडून सुनावणी घेण्यात येईल आणि महत्त्वाच्या सूचनांचा आराखड्यात समावेश करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अनेक पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, आदिवासी समूह यांनी यासाठी सूचना नोंदविल्या आहेत. 

राष्ट्रीय उद्यानातील वन क्षेत्राचे क्षेत्रफळ ५,४३५ हेक्टर आहे. या उद्यानाच्या सभोवतालच्या, सीमेपासून १०० मीटर ते ४ हजार मीटरचा भाग पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. 

त्यामुळे या वन जमिनीच्या क्षेत्रातील पाण्याचे संवर्धन करतानाच पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन, माती आणि त्यातील ओलावा यांचे संवर्धन, स्थानिकांच्या गरजा आणि आवश्यक पर्यावरण आणि पर्यावरणाचे इतर पैलूंची सांगड घालून हा अंतिम झोनल मास्टर प्लॅन बनवला जाणार आहे.
पालिकेने त्यासाठी आराखड्याचा मसुदा तयार केल्यानंतर त्यावर सूचना व हरकती मागवल्या. पालिकेच्या सूचनेनुसार, नागरिक, संस्था, संघटनांना सूचना व हरकतींसाठी ३० दिवसांची मुदत होती.

‘पर्यावरणापेक्षा बांधकाम रक्षणाला प्राधान्य’ 
 हरकती व सूचना नोंदवणे हा केवळ एक दिखावा असल्याचा आरोप काही पर्यावरणवादी करत आहेत. या आराखड्याचा उद्देश हा पर्यावरणाच्या रक्षणापेक्षा बांधकामाच्या रक्षणाचा अधिक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 
तसेच हा इतका मोठा विषय असून यावर तक्रारी करण्यासाठी दिलेला वेळही पुरेसा नसल्याचे मत ते मांडत आहेत. पाणथळ जमिनी, तलाव, वृक्ष संवर्धन यासाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 
 

Web Title: 100 objections to the master plan of Sanjay Gandhi National Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.