Join us
Daily Top 2Weekly Top 5

नायरच्या शताब्दीनिमित्त देणार 100 कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 06:55 IST

मुख्यमंत्र्यांची घोषणा; इतिहासात होईल रुग्णालयाच्या कार्याची नोंद

मुंबई : टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय या संस्थेला राज्य सरकारच्यावतीने शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालयाचा शतकपूर्तीवर्ष सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.  

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, जनतेला दीर्घायुष्य देणारी संस्था शतायुषी होते आहे, हे समाधान काही वेगळे असून, या संस्थेचा हा प्रवास थक्क करणारा आहे. संस्था निर्माण केल्यावर जीव ओतून इतरांना जीवदान देण्याचे काम या रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र केले आहे. आज मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद आहेत, देव केवळ मंदिरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये नाही तर डॉक्टरांच्या रूपात रुग्णांचा जीव वाचवीत आहे. कोविडचे संकट हे अनपेक्षित तितकेच अनाकलनीय होते, सुरुवातीला या संकटाची दहशत होती; मात्र आज आपण या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्यामुळे राज्य सरकार, प्रशासन यांचे सर्वत्र कौतुक झाले. 

कोविडच्या अगोदर शंभर वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली होती, आता त्याची काही माहिती उपलब्ध असेल असे वाटत नाही; मात्र यापुढे कोणताही विषाणू येईल त्यावेळी कोरोनाकाळात आपण काय केले? काय करायला हवे? याची  अधिकृत नोंद करण्याची आवश्यकता असून, ही माहिती ५०-१०० वर्षांनंतरदेखील उपलब्ध होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज बोलून दाखवितानाच या संस्थेला जेव्हा दोनशे वर्षे पूर्ण होतील त्यावेळी इतिहासात या रुग्णालयाच्या कार्याची निश्चितच नोंद होईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

तीन प्रयोग शाळांचे उदघाटनयाप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इम्युनॉलॉजी, शल्यक्रिया कौशल्य आणि संगणकाधारित शिक्षण या तीन प्रयोग शाळांचे उदघाटन करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची माहिती देणाऱ्या ‘गणेशोत्सव २०२१’ या माहितीपुस्तिकेचे तसेच नायर रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांना कोविड काळात आलेल्या अनुभवांचे संकलन असलेल्या पुस्तिकेचेही मुख्यमंत्री ठाकरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

टपाल कव्हरचे अनावरणभारतीय टपाल विभागाने नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त जारी केलेल्या विशेष टपाल कव्हरचे अनावरण करण्यात आले. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

टॅग्स :हॉस्पिटलमुख्यमंत्रीमुंबई