Join us

सरकारी अध्यापक विद्यालयातील १० सराव पाठशाळा बंद, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 06:11 IST

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने त्याबाबतचा प्रस्ताव सरकारला पाठविला होता. तो मंजूर झाला आहे.

मुंबई : सरकारी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. काहींतील विद्यार्थी संख्या शून्यावर आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सराव पाठ घेण्यासाठी उपलब्ध १० शासकीय सराव पाठशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने त्याबाबतचा प्रस्ताव सरकारला पाठविला होता. तो मंजूर झाला आहे. पुणे येथील लोणी काळभोरमधील सरकारी अध्यापक सराव पाठशाळा, अमरावतीतील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेशी संलग्न असलेली पाठशाळा अशा दोन्ही पाठशाळा विद्यार्थी संख्या नसल्याने तातडीने बंद करण्यात येतील. येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ३० नोव्हेंबरपूर्वी अन्य ठिकाणी रिक्त पदी समायोजन होईल.उर्वरित आठ पाठशाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून नजीकच्या शाळेत करण्यात येईल. यात पुणे येथील भवानी पेठ, मोदीखाना, अमरावतीतील वलगाव रोड, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा येथील सराव पाठशाळा आहेत. येथील शिक्षक, कर्मचारी यांचे समायोजन रिक्त पदांवर नंतर करण्यात येईल. समायोजनाचे अधिकार शिक्षण आयुक्तांना आहेत.

टॅग्स :शिक्षण