मध्य रेल्वेवर नव्या वर्षात १० फेऱ्यांची वाढ; हार्बर मार्गावरही एसी लोकल धडधडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 10:44 IST2025-11-23T10:44:29+5:302025-11-23T10:44:29+5:30
१५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता

मध्य रेल्वेवर नव्या वर्षात १० फेऱ्यांची वाढ; हार्बर मार्गावरही एसी लोकल धडधडणार
मुंबई - मध्य रेल्वेवर नव्या वर्षात लागू होणाऱ्या वेळापत्रकानुसार मुख्य मार्गावर १० ते १२ लोकल फेऱ्या व १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही खूशखबर मिळणार असून, एसी लोकल सुरू करण्याची परवानगी बोर्डाकडून अगोदरच घेतली असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. तर, नेरूळ-उरण मार्गावर १० फेऱ्या वाढविण्यात येतील.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेच्या सुधारित वेळापत्रकासाठी जानेवारी २०२६ उजाडणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विविध कारणांमुळे या वर्षीचे वेळापत्रक सुधारणांचे काम लांबले असून, जानेवारीमध्ये ते लागू करण्यात येणार आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये लागू केलेल्या सुधारित वेळापत्रकामध्ये मध्य रेल्वेच्या प्रवाशांना वाढीव लोकल फेऱ्या न मिळाल्यामुळे त्यांच्यात संतापाची भावना होती.
हार्बर मार्गावर एसी धावणार
जून महिन्यात झालेल्या मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मुख्य मार्गावर लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासह लोकलमधील गर्दीचे विभाजन करण्यासाठी १५ डब्यांच्या लोकलच्या फेऱ्यादेखील वाढवण्याची मागणी होत आहे.
मुख्य मार्गावर १० ते १२ लोकल तर १५ डब्यांच्या लोकलची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. यासाठी तयारी पूर्ण झाली असून, नव्या वर्षात प्रवाशांना खूशखबर मिळू शकते. हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू करण्याची परवानगी बोर्डाकडून अगोदरच घेतली आहे. तसेच हार्बर मार्गावर एसी लोकल प्रस्तावित आहे. तर नेरूळ - उरण मार्गावरदेखील १० फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.
लोकल सेवेत सुधारणा
मुख्य मार्गावर फेऱ्या वाढविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून (सीएसएमटी) सुटणाऱ्या काही मेल, एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसला (एलटीटी) वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकल सेवेत सुधारणा होऊन फेऱ्यादेखील वाढविता येतील.
३४ स्थानकात प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचा निर्णय
१५ डब्यांच्या लोकल वाढविण्यासाठी महामुंबईतील ३४ स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात येत आहे. त्यापैकी २७ स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी डिसेंबरअखेरपर्यंत पूर्णपणे वाढविण्यात येणार असून, यामुळे १५ डब्यांच्या अतिरिक्त लोकल चालविण्यास मदत मिळेल. सध्या १२ डब्यांच्या सुमारे १० लोकल १५ डब्यांमध्ये अपग्रेड केल्या जातील. १५ डब्यांच्या फेऱ्या वाढविल्यामुळे लोकलची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता थेट २५ ते ३० टक्के वाढू शकणार आहे. मध्य रेल्वेवर सध्या १८१० तर पश्चिम रेल्वेवर १४०६ इतक्या फेऱ्या चालवण्यात येत आहेत.