Join us

मुंबईत अकरावीच्या १.८६ लाख जागा रिक्त; सातव्या फेरीतील स्थिती: महाविद्यालये सुरू होणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 14:30 IST

दहावीचा निकाल लवकर जाहीर करूनही प्रवेशप्रक्रिया लांबली

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सातव्या फेरीत कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तिन्ही शाखा मिळून मुंबईत अकरावीच्या एक लाख ८६ हजार ६९० जागा रिक्त असल्याचे शिक्षण विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. तर प्रवेशप्रक्रिया खूप लांबल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची अनेक कनिष्ठ महाविद्यालयांची तक्रार आहे.

शैक्षणिक नुकसान

जागा रिक्त असल्यामुळे शासनाने बृहद् आराखडा करून याला न्याय दिला पाहिजे, असे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचे सरचिटणीस मुकुंदराव आंधळकर यांनी सांगितले. तर आमच्या महाविद्यालयात ७५ टक्के प्रवेश झाले, २५ टक्के बाकी आहेत.

चाचण्या उशिरा

सुट्ट्यांमुळे चाचण्या उशिरा होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी भीती बोरीवलीतील सायली कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आशीर्वाद लोखंडे यांनी सांगितले.

दहावीचा निकाल लवकर जाहीर करूनही प्रवेशप्रक्रिया लांबली आहे. आमच्या महाविद्यालयात विज्ञान शाखेचे प्रवेश झाले. महाविद्यालय सुरू झाले. कॉमर्स आणि आर्टसमध्ये ४० ते ५० जागा रिक्त आहेत.- जीन गोम्स, संचालिका, मार्शलीन जुनियर कॉलेज, कुर्ला

प्रवेशाबाबत कोणतीही सक्ती नाही. विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम नेमका दिल्यास त्यांची निवड होऊन प्रवेश मिळेल. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण विभाग बांधील आहे.- डॉ. महेश पालकर, संचालक, शिक्षण विभाग

टॅग्स :मुंबईशिक्षणमहाविद्यालयप्रवेश प्रक्रिया