१ लाख ३१ हजार ८२५ चालक आरटीओच्या रडारवर; १७ कोटी ८० लाखांचा दंड कारवाई करत वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 07:02 IST2026-03-04T07:02:26+5:302026-03-04T07:02:47+5:30
परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा आणखी मजबूत करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर जरब बसवण्यासाठी ६९ इंटरसेप्टर वाहनांची खरेदी केली होती.

१ लाख ३१ हजार ८२५ चालक आरटीओच्या रडारवर; १७ कोटी ८० लाखांचा दंड कारवाई करत वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झालेल्या अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे कारवाई सुरू आहे. ११ डिसेंबरपासून सुरू झालेल्या कारवाईच्या माध्यमातून १ लाख ३१ हजार ८२५ वाहनांवर आणि चालकांवर कारवाई करण्यात आली. या माध्यमातून अंदाजे १७ कोटी ८० लाख ७० हजार रुपये इतका दंड ठोठावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आकडेवारीनुसार सर्वाधिक नियमांचे उल्लंघन बाइकस्वारांनी केल्याचे समोर आले.
परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा आणखी मजबूत करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर जरब बसवण्यासाठी ६९ इंटरसेप्टर वाहनांची खरेदी केली होती. या वाहनांवर अत्याधुनिक रडार यंत्रणा बसवण्यात आली असून, या यंत्रणेच्या हाताळणीचे प्रशिक्षण २०० मोटार वाहन निरीक्षक, तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षकांना देण्यात आले होते. ही वाहने आता सर्व आरटीओ कार्यालयांनी वापरात काढली असून, त्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
रडार यंत्रणेचा वापर
आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार अपघात प्रवण क्षेत्र, महामार्ग, शहरातील अंतर्गत रस्त्यांवर, तसेच आवश्यक असलेल्या ठिकाणी या वाहनांच्या माध्यमातून कारवाई सुरू केली आहे. रडार यंत्रणेच्या माध्यमातून एका वेळेस ४ प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन शोधण्यास मदत होत असून, तासाभरात शेकडो वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकारी म्हणाले.
रडार यंत्रणेची वैशिष्ट्ये
नव्या इंटरसेप्टर वाहनांमध्ये रडार यंत्रणा, वाय-फाय आणि एनपीआर कॅमेरा आहे.
एनपीआर कॅमेऱ्यामध्ये इन्फ्रारेड तंत्रज्ञान असल्याने रात्रीच्या वेळेसही प्रभावी कारवाई करणे शक्य.
अधिकाऱ्यांना फक्त कारवाईसाठी एक विशिष्ट क्षेत्र (झोन) निश्चित करावे लागते.
रडार प्रणालीद्वारे वाहनांच्या हालचालींवर स्वयंचलित पद्धतीने नजर ठेवली जाते.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर ऑटोमॅटिक दंड ठोठावला जातो.
अशी आहे कारवाई
उल्लंघनाचा प्रकार कारवाई
हेल्मेट न घालणारा बाइकस्वार ८९,६५१
हेल्मेट न घालणारा पिलियन १३,३८४
ओव्हर स्पीडिंग ८,५२०
सीटबेल्ट नसणे ८,०२४
ट्रिपल सीट २,५६०
इन्शुरन्स ४,५१२
अवैध पीयूसी ४,६३७
सीटबेल्ट न लावलेला प्रवासी ५३७
एकूण १,३१,८२५
अपघातग्रस्तांना मदत, देवदूतांना बक्षीस
अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या ‘पीएम राहत’ योजनेअंतर्गत अपघातानंतरच्या पहिल्या सात दिवसांत १.५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार देण्याची तरतूद आहे. तसेच, अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या ‘जीवनदूतां’ना २५,००० रुपयांचे बक्षीस देण्याचीही तरतूद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.