Daily Top 2Weekly Top 5

पोर्तुगीजांनी एक हजार मंदिरे पाडली; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून पुनरुच्चार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:51 IST

स्मृती जपण्यासाठी दिवाडी बेटावर मंदिर उभारण्याची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील एक हजार मंदिरे पोर्तुगीजांनी पाडली. त्यामुळे साडेतीनशे वर्षांपूर्वी अनेकांनी आपल्या कुलदैवतांसह स्थलांतर केले. देशाच्या संपूर्ण किनारपट्टीवर गोमंतकीय विस्थापित आहेत. त्यांच्या आठवणींसाठी लवकरच कोटीतीर्थ कॉरिडॉरची उभारणी केली जाईल. दिवाडी बेटावर हे भव्य मंदिर बांधले जाणार आहे. जे गोमंतकीय राज्याबाहेर स्थायिक झाले आहेत, त्यांच्यासाठी हे मंदिर म्हणजे कुलदैवत ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी केले.

बायंगिणी-जुने गोवे येथील गोवेश्वर महाशिव मंदिरात आयोजित 'सोमनाथ स्वाभिमान पर्व २०२६' या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, 'राज्यातील पोर्तुगीज राजवटीच्या काळातील इतिहासाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'गावांतील मंदिरे पाडणे हे लोकांना प्रार्थनेसाठी एकत्र येण्यापासून रोखण्याचे पहिले पाऊल होते. भजन, कीर्तन यांसारख्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा कमकुवत करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. 

धर्मातराच्या आधीही मंदिरे उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले होते. अनेक गोमंतकीय पोर्तुगीजांच्या भीतीने आपले कुलदैवत घेऊन अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले. मध्यंतरी मी केरळला गेलो असताना तेथे काही गोमंतकीय स्थायिक झालेले दिसले. ते अजूनही कोकणी बोलतात. आपापले कुलदैवत घेऊन ते तेथे स्थायिक झाले आहेत. या कालखंडाची आठवण म्हणून मंदिर उभारले जाईल.'

सावंत म्हणाले की, गोवा ही 'देवभूमी' म्हणून ओळखली जाते आणि आध्यात्मिक पर्यटनासाठी येणारे पर्यटक येथे मोठ्या श्रद्धेने भेट देतात. मंदिर पर्यटनामुळे राज्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाला बळ मिळत आहे.

मंदिर पर्यटनाकडे कल

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, 'पूर्वी लोक जुन्या गोव्यात फक्त चर्च पाहायला येत होते. पण आता येथे गोवेश्वर मंदिर पहायला येतात. एकाच ठिकाणी १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची सोय उपलब्ध असल्याने भाविक, पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत आहेत. त्यामुळे राज्यातील सांस्कृतिक आध्यात्मिक पर्यटनात भर पडली आहे. श्रद्धास्थानांप्रती लोकांचे आकर्षण कायम राहील' असे मुख्यमंत्री म्हणाले.

'जेन झी'ने संस्कृतीचे महत्त्व समजून घ्यावे

मुख्यमंत्री म्हणाले, 'आगामी पिढीने आणि 'जनरेशन झेड'ने सनातन धर्म तसेच भारतीय संस्कृतीचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सोमनाथ पर्व यांसारखे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीला आपल्या परंपरा, संस्कृती आणि धार्मिक वारशाची ओळख होते. समाजात धर्म, संस्कृती आणि मूल्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे.

मोदींचे प्रभावी नेतृत्व

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशातील मंदिरे आणि धार्मिक संस्कृतीचे जतन करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम प्रभावीपणे होत आहे' असे मुख्यमंत्री म्हणाले.

देशभरात कार्यक्रम

मुख्यमंत्री म्हणाले, 'गुजरातमधील सोमनाथ मंदिर एक हजार वर्षांपूर्वी गझनीने उद्ध्वस्त केले. नंतर देशाच्या स्वातंत्र्यानंतर या मंदिराचे पुनर्निर्माण झाले. याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, हा अभिमानाचा क्षण आहे. यानिमित्त देशभर कार्यक्रम होतील. राज्यात हा कार्यक्रम तपोभूमी येथे होणार आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Portuguese destroyed temples; Goa CM vows corridor for displaced deities.

Web Summary : Goa CM Pramod Sawant says Portuguese destroyed a thousand temples, prompting mass migration with deities. A corridor will be built on Divar Island to remember displaced Goans and their heritage, fostering spiritual tourism.
टॅग्स :गोवाप्रमोद सावंतमंदिरमंदिरसांस्कृतिक