लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन तुटवडा आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील परिणाम यामुळे राज्यातील विदेशी पर्यटकांची संख्या घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि विशेषतः मान्सून पर्यटन विकसित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने २० मे रोजी पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
गुरुवारी पर्यटन खात्यात झालेल्या प्राथमिक बैठकीत विमान कंपन्यांचे प्रतिनिधी, हॉटेल व्यावसायिक, रॉक्स चालक तसेच इतर संबंधित घटकांशी चर्चा करण्यात आली. या चर्चेत मान्सून हंगामात पर्यटक आकर्षित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर सखोल विचारमंथन करण्यात आले.
मंत्री खंवटे म्हणाले की, जानेवारी ते एप्रिल या कालावधीत गोव्यात पर्यटकांची चांगली वर्दळ होती, मात्र त्यात देशांतर्गत पर्यटकांचे प्रमाण अधिक होते. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि इंधन बचतीसाठी दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे परदेशी पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार आता देशांतर्गत आणि स्थानिक पर्यटकांवर अधिक भर देणार आहे.
गोव्यातील अर्थव्यवस्थेचा मोठा भाग पर्यटन व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे हॉटेल उद्योग, रॉक्स चालक, टॅक्सी व्यवसायिक यांचे उत्पन्न टिकवून ठेवणे गरजेचे आहे. मान्सून पर्यटनाचा विस्तार करून या सर्व घटकांना संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यातील नैसर्गिक सौंदर्य, धबधबे, हिरवळ आणि पारंपरिक अनुभव यांचा लाभ घेऊन पर्यटकांना वेगळा अनुभव देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा विचार असल्याचे मंत्री खंवटे म्हणाले.
संभाव्य उपक्रम
मान्सून हंगामात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 'रेन एक्स्पिरियन्स' संकल्पना राबविणे, धबधबे आणि निसर्गरम्य स्थळांवर मार्गदर्शित पर्यटन फेऱ्या आयोजित करणे, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करणे, तसेच ग्रामीण पर्यटनाला चालना देणे यावर भर दिला जाणार आहे.
२ विदेशी पर्यटकांची संख्या घटण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकार देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष मोहिमा राबविणार आहे. सवलतीचे पॅकेज, स्थानिक प्रवास सुविधा, तसेच डिजिटल प्रचार माध्यमांचा वापर करून गोव्याचा मान्सून अनुभव देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Web Summary : Goa plans to boost monsoon tourism amid declining foreign visitors. A stakeholders meeting on May 20 will explore strategies, focusing on domestic tourists and local experiences to support the tourism economy.
Web Summary : गोवा विदेशी पर्यटकों की घटती संख्या के बीच मानसून पर्यटन को बढ़ावा देने की योजना बना रहा है। पर्यटन अर्थव्यवस्था का समर्थन करने के लिए 20 मई को एक हितधारक बैठक रणनीतियों का पता लगाएगी, जो घरेलू पर्यटकों और स्थानीय अनुभवों पर ध्यान केंद्रित करेगी।