Daily Top 2Weekly Top 5

तपास भरकटवण्याचा बांगलादेशी दरोडेखोरांचा डाव उधळला; गुन्हे शाखेने ओळखला खोटारडेपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:08 IST

या दरोड्यातील कोट्यवधींची लूट नेमकी कुठे लपवून ठेवली आहे, याचा शोध घेणे सध्या पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दोनापावला आणि म्हापसा येथील गणेशपुरी येथील बंगल्यांवर दरोडा टाकून कोट्यवधींची लूट करणाऱ्या बांगलादेशी दरोडेखोरांच्या टोळीचा एक मोठा डाव गोवा गुन्हे शाखेने (क्राइम ब्रँच) उधळून लावला.

गुन्ह्यातील मुद्देमाल लपवण्यासाठी आणि पोलिसांच्या तपासाची दिशा भरकटवण्यासाठी संशयितांनी रचलेला बनाव एका चलाख पोलिस निरीक्षकामुळे फसला. दिल्लीत अटक झाल्यानंतर या टोळीतील पाच संशयितांना गुन्हे शाखेने गोव्यात आणले होते. सध्या त्यांची रवानगी कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

या दरोड्यातील कोट्यवधींची लूट नेमकी कुठे लपवून ठेवली आहे, याचा शोध घेणे सध्या पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. ही टोळी गुन्हेगारी जगतात कमालीची सराईत असल्यामुळे सुरुवातीला त्यांनी पोलिसांना तपासात अजिबात सहकार्य केले नाही. 

कोणत्याही प्रश्नावर 'काही माहीत नाही, आठवत नाही' अशीच उत्तरे त्यांच्याकडून मिळत होती. मात्र, मागील आठवड्यात अचानक या संशयितांनी पोपटासारखे बोलण्यास सुरुवात केली. लुटलेला सर्व पैसा आणि ऐवज बंगळुरू येथील 'साउदी' नावाच्या व्यक्तीकडे ठेवल्याचा दावा त्यांनी केला.

या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने तातडीने बंगळुरूला पथक पाठवण्याची तयारी केली. परंतु, पथक रवाना होण्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या एका निरीक्षकाने संशयितांच्या या दाव्याची पडताळणी केली आणि 'साउदी'ची कुंडली बाहेर काढली.

या तपासात समोर आले की, ज्या तो स्वतः मूळचा बांगलादेशी असून गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. विशेष म्हणजे, जेव्हा गोव्यात हा दरोडा पडला, तेव्हा हा साउदी 'एनआयए'च्या अटकेत असून न्यायालयीन कोठडीत होता.

जेलमध्ये असलेल्या व्यक्तीकडे मुद्देमाल सोपवणे अशक्य असल्याने, या टोळीने पोलिसांना फिरवण्यासाठीच साऊदीच्या नावाचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले. गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे पोलिसांचा वेळ आणि श्रम वाचले. आता या मूळ मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी तपासाचा फास अधिक आवळला आहे.

तोंड न उघडणारे बांगलादेशी

गोवा गुन्हे शाखेने अटक केलेली ही बांगलादेशी दरोडेखोरांची टोळी गुन्हेगारी जगतात चांगलीच मुरलेली आणि सराईत असल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान या टोळीतील एकही संशयित तपासाला अजिबात सहकार्य करत नसल्याने पोलिस हैराण झाले आहेत. 

पोलिसांच्या खाक्याचा किंवा चौकशीच्या पद्धतींचाही त्यांच्यावर फारसा परिणाम होत नसून, काहीही विचारल्यास 'आठवत नाही' असा नकाराचा पाढा ते सतत वाचत आहेत. गुन्हेगारांच्या या असहकार्यामुळे आणि ढिम्म प्रतिसादामुळे दोन्ही दरोड्यातील लूट नेमकी कुठे लपवून ठेवली आहे, याचा शोध घेणे सध्या गुन्हे शाखेसमोर एक अत्यंत कठीण आव्हान बनले आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladeshi Robbers' Deception Foiled; Crime Branch Exposes Falsehood.

Web Summary : Goa Crime Branch foiled Bangladeshi robbers' plan to mislead investigation of crores looted from Dona Paula and Mapusa bungalows. Suspects claimed loot was with 'Saudi' in Bangalore, but it was proven false. Investigation continues.
टॅग्स :गोवापोलिस