लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यातील शेतकरी, कृषी क्षेत्राशी संबंधित घटक आणि नागरिकांना 'स्वयंपूर्ण गोवा' उभारण्यासाठी सेंद्रिय शेती आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतेच केले आहे.
गोव्याचे निसर्गाशी असलेले पारंपरिक नाते जपत पर्यावरणपूरक शेतीकडे वाटचाल करणे ही काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राने शाश्वत आणि पर्यावरणस्नेही विकासाचे नेतृत्व करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सात आवाहनांच्या अनुषंगाने आणि 'फोआर' संकल्पनेनुसार राईट सोर्स, राईट डोस, राईट टाइम आणि राईट प्लेस -शेतकऱ्यांनी जबाबदार व वैज्ञानिक शेती पद्धती स्वीकारल्या पाहिजेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. या माध्यमातून रासायनिक खतांचा वापर कमी करून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवता येईल तसेच पर्यावरणाचे संरक्षणही साधता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणाऱ्या नैसर्गिक खतांचा वापर वाढविणे तसेच नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
यामुळे गोव्याला देशातील सेंद्रिय आणि शाश्वत शेतीचे आदर्श राज्य म्हणून नवी ओळख मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शाश्वत शेती ही 'विकसित गोवा' आणि 'स्वयंपूर्ण गोवा' घडविण्याचा महत्त्वाचा पाया असल्याचे सांगताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्यावरणपूरक शेतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल, जैवविविधतेचे संरक्षण होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळेल, असे नमूद केले. राज्यातील शेतकरी, सहकारी संस्था, स्वयं-साहाय्य गट आणि कृषी क्षेत्रातील विविध घटकांनी एकत्रितपणे पुढाकार घेत गोव्याला शाश्वत शेतीचे राष्ट्रीय मॉडेल बनवावे, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले.
शाश्वत शेती ही स्वयंपूर्ण आणि विकसित गोव्याचा भक्कम पाया आहे, असे सांगत हरित विकास आणि शेतकरी कल्याणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
Web Summary : Chief Minister Pramod Sawant urged Goa to embrace organic farming for a self-sufficient state. He emphasized sustainable practices, reducing chemical fertilizers, promoting natural fertilizers, and fostering a green economy for farmers' prosperity and biodiversity.
Web Summary : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने गोवा से आत्मनिर्भर राज्य के लिए जैविक खेती अपनाने का आग्रह किया। उन्होंने टिकाऊ प्रथाओं, रासायनिक उर्वरकों को कम करने, प्राकृतिक उर्वरकों को बढ़ावा देने और किसानों की समृद्धि और जैव विविधता के लिए हरित अर्थव्यवस्था को बढ़ावा देने पर जोर दिया।