मूळच्या उत्तर प्रदेशच्या असणाऱ्या प्रीती जैन नैनुट्टिया यांनी लेखिका ते फॅशन डिझायनर हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. फॅशन जगताकडे केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून न पाहता, समाजाच्या ऋणांशी नाळ जोडून या क्षेत्रात त्या काम करत आहेत. प्रीती यांचे नुकतेच ‘बिक्वेस्ट कलेक्शन’ लाँच झाले झाले आहे. त्यांच्या या नव्या ब्रॅँडविषयी अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला हा संवाद...फॅशन डिझायनिंगकडे कसे वळलात?मी लेखिका आहे. समाजातील विविध गोष्टींचे, व्यक्तींचे निरीक्षण करून त्यातून प्रेरणा घेत लिखाण करण्यावर माझा भर असतो. फॅशनची पूर्वीपासून आवड आहे. मी स्वत:वर फॅशनचे वेगवेगळे फंडे अजमावत असते. यातूनच स्वत:चे कलेक्शन करावे, ही कल्पना सुचली. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून फॅशन या क्षेत्रात काम करतेय.तुमच्या कलेक्शनची वैशिष्ट्ये काय?सध्या माझे ‘बिक्वेस्ट कलेक्शन’ लाँच झाले आहे. महाराष्ट्राचे वास्तुवैभव जगभरात प्रसिद्ध आहे. या वास्तुसंपन्नतेतून प्रेरणा घेऊन हे कलेक्शन डिझाइन केले आहे. यात नाशिकमधील मंदिरे, एलिफंटा गुंफा, अजिंठा वेरूळ, महालक्ष्मी मंदिरच्या डिझाईन्स आहेत. या लेक्शनमधील ठरावीक भाग चॅरिटीसाठी राखीव असून त्याची रक्कम जेएसडब्ल्यू फाउंडेशनला सुपुर्द करण्यात येणार आहे. शायना एन.सी., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अल्का निशार, सुषमा जैन, शीतल गगरानी, नीना सत्बीर सिंग, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या पत्नी अंजना क्षत्रिय यांनी माझ्या कलेक्शनला मनापासून दाद दिली आहे. यापूर्वीही माझे निर्मूह, ब्रायडल, फ्लोरल, पार्टीवेअर असे वेगवेगळे कलेक्शन्स लाँच झाले आहेत. फॅशन क्षेत्रातील बदलांकडे कसे पाहता?हे क्षेत्र अतिशय स्पर्धात्मक बनले आहे. या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी लोकांना काय आवडते, भविष्यात त्यांची काय मागणी असेल, हे जाणून घेणे गरजेचे असते. जीवनशैलीतले बदलही इमेज कॉन्शस्नेसला दुजोरा देत आहेत. कपडे आणि अॅक्सेसरीज हा व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग झाला आहे. भविष्याततील वाटचाल कशी असेल?वेगळ्या फॅशन कलेक्शनसाठी काम करतेय. यासाठी काही हटके संकल्पनांसाठी अभ्यास सुरू आहे. त्यात पारंपरिक, पाश्चिमात्य, फ्युजन अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असतो. या निरीक्षणातून कलेक्शनसाठी वेगळे करायचे आहे. लवकरच वेगळे कलेक्शन घेऊन फॅशन जगतात येईन, हे निश्चित.
लेखिका ते फॅशन डिझायनर...!
By admin | Updated: April 7, 2016 01:01 IST