Join us  

शिवगामीच्या भूमिकेबद्दल आत्ता बोलण्यात काय अर्थ?- श्रीदेवी

By admin | Published: June 09, 2017 9:55 AM

मानधनाच्या वादामुळे श्रीदेवीने या सिनेमाला नकार दिला, अशी चर्चा सिनेवर्तुळात सुरू आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 9- एसएस राजामौली यांच्या बाहुबली या सिनेमातील पात्राला प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतलं आहे. राजमाता शिवगामीची बोलायची पद्धत, ऑनस्क्रीन अॅटीट्यूड या सगळ्याला प्रेक्षकांनी भरभरून दादही दिली. दाक्षिणात्य अभिनेत्री रम्या कृष्णन यांनी ही भूमिका साकारली आहे. पण  सिनेमातील शिवगामीची भूमिका सुरूवातीला बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीला ऑफर करण्यात आली होती. पण श्रीदेवीने अती मानधन मागितल्यामुळे शेवटी राजामौली यांनी शिवगामीच्या भूमिकेसाठी रम्या कृष्णनला घेतलं. रम्याने या भूमिकेला  योग्य न्याय दिला आहे.  विशेष म्हणजे श्रीदेवीने ‘बाहुबली’ सिनेमा नाकारून ‘पुली’ सिनेमा स्वीकारला होता. या सिनेमात तीने एका राणीची व्यक्तिरेखा साकारली  होती. पण सिनेमाला बॉक्सऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. तर बाहुबली सिनेमाने १७०० कोटींहून अधिक कमाई केली.
 
‘बाहुबली’ सिनेमाच्या दोन्ही भागांना मिळालेल्या ग्रँड सक्सेनंतर  श्रीदेवीने हा सिनेमा का  नाकारला असेल असाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे. हा प्रश्न फक्त सामान्य लोकांनाच नाही तर सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांना सुद्धा पडला होता.  पण मानधनाच्या वादामुळे श्रीदेवीने या सिनेमाला नकार दिला, अशी चर्चा सिनेवर्तुळात सुरू आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून श्रीदेवीने या प्रश्नाचं उत्तर दिलं नव्हतं. पण नुकतंच ‘मॉम’ सिनेमाच्या प्रमोशनवेळी तिने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ‘दुसऱ्या अभिनेत्रीने ही भूमिका साकारली, सिनेमाचे दोन्ही भाग प्रदर्शित झाले आणि सुपर हिटही झाले. मग आता याबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे?’ असा सवाल तीने प्रसारमाध्यमांना विचारला.
 
‘बाहुबली २’ हा सिनेमा एप्रिल महिन्यात प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडले. सिनेमा प्रदर्शित होऊन सहा आठवडे झाले आणि अजूनही काही थिएटर्समध्ये हा सिनेमा सुरू आहे. या सिनेमाने आतापर्यंत १७०० कोटींपर्यंत मजल मारली असली तरी हा सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित व्हायचा आहे, त्यामुळे येत्या काळात हा सिनेमा २००० कोटींपर्यंत सहज कमाई करू शकतो असा विश्वास ‘बाहुबली’च्या टीमला आहे.