Join us  

'फॅमिली मॅन 3' च्या शूटींगला सुरुवात! छोटा 'बांसुरीवादक' आता दिसतोय असा, पहिला फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 3:04 PM

'फॅमिली मॅन 3'च्या शुटींगला सुरुवात झाली असून सेटवरील पहिला फोटो समोर आलाय. यात श्रीकांत तिवारीची दोन्ही मुलं आता मोठी झालेली दिसत आहेत (family man 3, manoj bajpayee)

मनोज वाजपेयी यांच्या आगामी 'फॅमिली मॅन 3' सर्वांना उत्सुकता होती. आधीचे दोन्ही सीझन सुपरहिट झाल्याने 'फॅमिली मॅन 3' कधी येणार याची सर्वजण वाट पाहत होते. अखेर नुकतीच प्रेक्षकांना आनंदाची बातमी मिळाली आहे. 'फॅमिली मॅन 3' च्या शूटींगला सुरुवात झाली असून सिनेमाच्या टीमचा पहिला फोटो समोर आलाय. त्यामुळे प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आलंय. याशिवाय श्रीकांत तिवारीची दोन्ही मुलं आता मोठी झाली असून त्याचा लाडका 'बांसुरीवादक' ओळखूच येणार नाही असा दिसतोय.

'फॅमिली मॅन 3' बद्दल प्राईम व्हिडीओने मोठे अपडेट दिले आहेत. यात तीन फोटो शेअर करण्यात आले आहेत. एका फोटोत 'फॅमिली मॅन 3' च्या शूटींगचा क्लॅप दिसतोय. तर दुसऱ्या फोटोत मनोज वाजपेयी 'फॅमिली मॅन 3' चे दिग्दर्शक राज आणि डीकेसोबत  खास पोज देताना दिसतोय. 'फॅमिली मॅन 3' च्या निमित्ताने आणखी एक फोटो व्हायरल झालाय. यात श्रीकांत तिवारी अर्थात मनोज वाजपेयीचा मुलगा आता मोठा झालेला दिसतोय. 

'फॅमिली मॅन 3' च्या फोटोकडे नजर टाकली तर ग्रुप फोटोत मनोज वाजपेयी दिसतोय. त्याच्या बाजूला त्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी प्रियामणी, मित्र शरीब हाश्मी याशिवाय त्याची दोन्ही मुलं दिसत आहेत. या फोटोत खास लक्ष वेधून घेतलंय ते छोट्या बांसुरीवादक अर्थात मनोज वाजपेयीच्या मुलाने. दोन्ही सीझनमध्ये जो विविध वाद्य वाजवत मनोज वाजपेयीला जेरीस आणतो असा त्यांचा मुलगा आता मोठा झालाय. त्याला मिशीही फुटली असून चष्माही लागलेला दिसतोय. अशाप्रकारे हे फोटो पाहून सर्वांना 'फॅमिली मॅन 3' ची उत्सुकता लागली आहे.

 

टॅग्स :मनोज वाजपेयीवेबसीरिज