Join us  

'आम्ही धास्तावलो आहोत... आमचे पैसे...', चित्रपट बॉयकॉटवरुन पुष्कर श्रोत्रीनं राम कदमांना सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 4:04 PM

Pushkar Shotri : दीपिका पादुकोणच्या भगव्या बिकनीच्या वादावरदेखील पुष्कर श्रोत्रीने त्याचे स्पष्ट मत मांडले.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान(Shah Rukh Khan)चा पठाण (Pathaan Movie) चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं नुकतेच रिलीज झाले. या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन वादाला सुरुवात झाली आणि सोशल मीडियावर चित्रपटाच्या बंदीची मागणी होताना दिसते आहे. या वादात काही राजकीय नेत्यांनीही उडी घेतली. भाजप आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांनी याप्रकरणी एक आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री(Pushkar Shotri)ने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत पुष्कर श्रोत्री म्हणाला की, कोरोनानंतर प्रेक्षक हे चित्रपटगृहात येत नाही. एक निर्माता दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून मला याची धास्ती आहे. प्रेक्षकांची चित्रपटगृहात यावं आणि पूर्वीसारखं चित्रपटाचा आनंद घ्यावा यासाठी मी काय करायला हवं याचा विचार मी सतत करत असतो. कोणत्याही एका क्षुल्लक कारणावरुन कपड्याचा रंग हा असावा की तो असावा हा प्रश्न किती किरकोळ आहे. त्या गाण्यात दीपिका पादुकोणने अनेक रंगाचे कपडे घातले आहेत. सोनेरी, पिवळा, निळा, सप्तरंगी असे रंगाचे कपडे घातलेत. त्यामुळे एखाद्या रंगावर प्रत्येक पक्षाचा किंवा धर्माचा हक्क असू शकत नाही. त्यापेक्षा लोकांना चित्रपटगृहात आणण्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला मदत करायला हवी. 

'एका रंगासाठी चित्रपट बॉयकॉट करणं चुकीचं' तो पुढे म्हणाला की, राम कदम असू देत किंवा आणखी कोणी राजकीय नेतेमंडळी, पक्षातील लोकांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे. पण यापुढेही करायला हवी की लोकांनी थिएटरमध्ये यायला हवे. चित्रपट हे चित्रपटगृहात बघायला पाहिजे, यासाठी आम्हाला मार्गदर्शन, मदत, पाठिंबा, प्रेम हे तुमच्याकडून मिळायला हवं. कारण बॉयकॉट करणे हे चुकीचे आहे. आम्हाला त्याची फार भीती वाटते. आम्ही धास्तावलो आहोत. आमचे पैसे पणाला लागलेले असतात. निर्माते घर गहाण टाकून चित्रपट बनवतात. या सर्वांना तुम्ही एका रंगासाठी बॉयकॉट करुन चित्रपट पाहू नका असे सांगणे चुकीचे आहे.

पुष्कर श्रोत्रीचा राम कदम यांना सवालराम कदम सर तुम्ही संत महात्मांना पाठिंबा देताय ही चांगली बाब आहे. पण तुम्ही हे गाणं पाहिलं असेल त्यात तिने विविध रंगाचे कपडे घातलेत. या एका रंगावर माझा हक्क आहे आणि हा रंग त्यांचा आहे असं म्हणू शकत नाही. जर बॉयकॉट करायचा नसेल तर तुम्ही इथे जाहीरपणे सांगा की चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहा, जर तो तुम्हाला आवडला तर ते जाहीरपणे सांगा. तसेच जर नाही आवडला तर तुम्ही ते वाईट आहे तो बघायला जाऊ नका, असे देखील सांगा. पण तुम्ही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहा, असं जाहीरपणे का सांगत नाहीत?, असा सवालदेखील पुष्करने केला,सोशल मीडियावर सतत चर्चेत राहण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. कंपनीकडून २ जीबीचा डेटा मला फुकट मिळतोय. त्यामुळे मी लेखक, दिग्दर्शक आणि न्यायधीश झालोय, मी सांगतो म्हणून हे बॉयकॉट करा असं म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही पुष्कर श्रोत्री म्हणाला.

राम कदम यांनी दिला होता इशारा

दरम्यान राम कदम यांनी काही दिवसांपूर्वी 'पठाण' चित्रपटाच्या वादात उडी घेत एक ट्वीट केले होते. त्यात ते म्हणाले की, पठाण चित्रपटाला देशभरातील साधू-संतांसह सोशल मीडियावर विरोध होत आहे. अनेक हिंदू संघटना या चित्रपटाला विरोध करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातही सध्या हिंदुत्व विचारधारा असणारे सरकार आहे. त्यामुळे चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची बाजू स्पष्ट करावी. साधू-संतानी जे आक्षेप घेतलेत, त्यावर त्यांचं (निर्माता-दिग्दर्शक) काय म्हणणं आहे हे जनतेसमोर स्पष्ट करावे. महाराष्ट्रच्या भूमीवर हिंदुत्वचा अपमान करणारी कोणताही सिनेमा किंवा मालिका चालू देणार नाही आणि ती खपवूनही घेतली जाणार नाही, असा कडक इशारा राम कदम यांनी दिला होता.

टॅग्स :पुष्कर श्रोत्रीराम कदम