Join us

आभासी धक्कातंत्रचा मांडलेला डाव

By admin | Updated: June 16, 2014 11:46 IST

खेळात स्वप्नाला स्थान नसले तरी जागलेपणी धक्कातंत्रचा प्रयोग करून चित्रपटाची भैरवी संपूर्ण कथेचा ट्रॅकच बदलून टाकते आणि हेच भातुकली या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे.

राज चिंचणकर
 
मराठी चित्रपट - भातुकली
 
दर्जा : बरा
 
कौटुंबिक नाती जपत साधे सरळ आयुष्य जगत असताना अचानक ते स्वप्न असल्याचे अनुभवास यावे आणि या अचानक आलेल्या अनुभवाने थरारून जावे, अशा प्रकारचा खेळ ‘भातुकली’ या चित्रपटात मांडला आहे. अर्थात या खेळात स्वप्नाला स्थान नसले तरी जागलेपणी धक्कातंत्रचा प्रयोग करून चित्रपटाची भैरवी संपूर्ण कथेचा ट्रॅकच बदलून टाकते आणि हेच या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे. यादृष्टीने भातुकलीचा हा खेळ मांडल्याचा आभास हा चित्रपट निर्माण करतो.
ऐश्वर्य ज्याच्या घरात पाणी भरते आहे असा श्रीकांत देशमुख हा मोठा व्यावसायिक, कौटुंबिक नात्यांपासून दूर आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे अंतर भरून काढण्यासाठी तो त्याच्या सगळ्या कुटुंबाला फार्म हाउसवर एकत्र बोलावतो. आई, पत्नी आणि तीन मुले असलेला श्रीकांत तसा कडक शिस्तीचा, परिणामी कुटुंबात त्याचा धाक आहे. या सर्वाच्या एकत्र येण्यात श्रीकांतचा सेक्रेटरी समन्वयाची भूमिका बजावतो. गप्पांच्या ओघांत त्यांच्यातली नाती फुलत जातात. याचवेळी श्रीकांतचा मित्र शेन अत्रे त्यांच्यात सामील होतो आणि आता सर्वकाही जुळून आल्याचे वाटत असतानाच चित्रपट अनपेक्षित असा धक्का देऊन संपतो.
चित्रपटाची कथा एवढीच आणि सोपी आहे, मात्र तिचा शेवट ज्या बिंदूवर केला आहे, तो कथेला पूर्णत: वेगळे वळण देणारा आहे. रोहित जोशी याने या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून शेवटर्पयत कसलीही शंका येणार नाही अशी योजना त्याने चित्रपट लिहितानाच केली आहे. त्यामुळे एक फॅमिली ड्रामा बघत असताना त्यामागे वेगळ्याच घडामोडी घडत असल्याचा सुगावाही लागत नाही. मात्र याचा उलगडा झाल्यावर केवळ अचंबित होणो एवढेच हाती राहते. धक्कातंत्रचा हा प्रयोग विचार करण्यास मात्र भाग पाडतो.
यातली श्रीकांतची भूमिका केवळ अजिंक्य देवसाठीच लिहिली गेली असावी इतके प्रभावी काम अजिंक्यने यात केले आहे. उत्तम व्यक्तिमत्त्वाचा चपखल वापर करत अजिंक्यने ही भूमिका ठोसपणो साकारली आहे. स्मिता तळवलकर (आई), शिल्पा तुळसकर (पत्नी), सुनील बर्वे (भाऊ), शशांक शेंडे (सेक्रेटरी), किरण करमरकर (मित्र) यांच्या भूमिकाही सरस आहेत. 
तीन मुलांच्या भूमिकेत समीर परांजपे, तन्वी किशोर व साहिल शेलार यांनी केलेले काम आश्वासक आहे. पूर्वार्धात धीम्या गतीने चालणारा हा चित्रपट नंतर वेग पकडतो आणि शेवटी कळस गाठतो खरा; परंतु एखादी लाट जोरात धडकून गेल्यावर पुढच्याच क्षणी किना:यावर जागवणा:या रितेपणाचा अनुभवही चित्रपट देतो.