Join us  

विराट कोहलीने दिला स्माइल फाउंडेशनला हात

By admin | Published: May 05, 2016 3:30 AM

विराट कोहली फाउंडेशनने स्माइल फाउंडेशन या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेसोबत वंचित मुले आणि युवकांच्या सशक्तीकरणासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. याच कार्यक्रमांतर्गत जून महिन्यात

विराट कोहली फाउंडेशनने स्माइल फाउंडेशन या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेसोबत वंचित मुले आणि युवकांच्या सशक्तीकरणासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. याच कार्यक्रमांतर्गत जून महिन्यात मुंबईमध्ये चॅरिटी डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. विराट कोहली स्वत: भोजन देणार आहे. यावेळी अनेक क्रिकेटपटू, उद्योजक, कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवरांना बोलविण्यात येणार आहे. शेफ विकास खन्ना हे सुमारे २०० आमंत्रितांसाठी पंचतारांकित भोजन तयार करणार आहेत.

यासंदर्भात बोलताना विराट म्हणाला, की मुले आणि युवक हे, येत्या काळातील विद्यार्थी, नेते, उद्योजक आणि देशाचे भवितव्य आहेत. त्यांच्या सशक्तीकरणासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांच्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठीच नव्हे, तर स्वत:ची काळजी घेण्याइतपत त्यांना उभे करणे, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांना तयार करणे आणि भविष्यातील नेते म्हणून त्यांना पुढे आणणे हा आमचा उद्देश आहे. स्माइल फाउंडेशनने याकामी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल मला आनंद वाटतो. पंचतारांकित शेफ विकास खन्ना हे स्माइल फाउंडेशनचे ग्लोबल अ‍ॅम्बेसेडर आहेत. याच कार्यक्रमात विकास खन्ना यांच्या ‘उत्सव : अ कलिनरी इपिक आॅफ इंडियन फेस्टिव्हल’ याच्या १२ व्या आवृत्तीचा लिलाव होणार आहे. शिक्षणासाठी पोषण या कार्यात ते सल्ला देतात. विकास खन्ना यांच्यानुसार योग्य पोषण आहार युवा पिढीसाठी महत्त्वाची बाब आहे. सशक्त भारताच्या उभारणीसाठी हे आवश्यक आहे. आहाराअभावी कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी स्माइल फाउंडेशनसोबत मी काम करतो आहे. विराट कोहली हा सध्या भारतामधील युवकांचा क्रीडा क्षेत्रातील आदर्श ठरला आहे. भारतीय युवकांची आशा, महत्त्वाकांक्षा आणि लाखो स्वप्ने त्याच्याशी जोडली गेली आहेत. विराट कोहली फाउंडेशनच्या सामाजिक कामाचे आम्ही कौतुक करतो. त्यामुळे मुले आणि युवकांच्या सशक्तीकरणासाठी आम्ही या संघटनेसोबत काम करण्याचे ठरविले असल्याचे स्माइल फाउंडेशनचे सहसंस्थापक आणि कार्यकारी विश्वस्त शंतनू मिश्रा यांनी साांगितले. स्माइल फाउंडेशन मुले आणि युवकांसाठी काम करते. त्यांना शिक्षण, प्रशिक्षण कौशल्ये, योग्य आहार आणि संधीसाठी काम करते. याचा आतापर्यंत चार लाख मुलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना फायदा झाला आहे.