Join us

हसतखेळत प्रबोधनाचा संजीवन प्रयोग

By admin | Updated: October 31, 2016 02:14 IST

मनोरंजन हा नाट्यकृतीचा मुख्य उद्देश असला, तरी काही वेळा त्यामागे समाजाचे प्रबोधन करण्याचा सुप्त हेतूसुद्धा असू शकतो.

-राज चिंचणकरमनोरंजन हा नाट्यकृतीचा मुख्य उद्देश असला, तरी काही वेळा त्यामागे समाजाचे प्रबोधन करण्याचा सुप्त हेतूसुद्धा असू शकतो. ज्या गोष्टी सतत कानीकपाळी ओरडूनही पचनी पडत नाहीत; त्यांना हसतखेळत मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केल्यास त्या मनात सहज घर करतात आणि त्यावर विचारही केला जातो. हे गृहीतक पाया म्हणून वापरत ‘याल तर हसाल’ हा प्रयोग समाजाला हसतखेळत बरेच काही सांगून जातो.महाराष्ट्राला एकपात्री प्रयोगांची मोठी परंपरा आहे आणि त्या मांदियाळीत हा प्रयोग चपखल बसतो. हास्यप्रबोधनकार म्हणून स्वत:ची ओळख ठसवणारे संजीवन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा प्रयोग उतरला आहे. या प्रयोगातून त्यांनी कडू गोळी साखरेच्या वेष्टनातून समाजाच्या गळ्याखाली उतरवण्याचा केलेला प्रयत्न लक्षवेधी आहे. तुमच्या-आमच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांना मध्यवर्ती स्थान देत, त्यावर यथेच्छ टिप्पणी करत समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे महत्त्वाचे कार्य हा प्रयोग करतो. हास्य, काव्य, लोककला, संस्कार, बोलीभाषा यांचा वापर यात मुक्तपणे केला आहे. पण हे सर्व करताना, कुठेही गांभीर्याचा डोस जास्त होऊ न देण्याची खबरदारी संजीवन म्हात्रे यांनी घेतली आहे. परिणामी, हास्याचे चौकार आणि षटकार ओढत, आचारविचारांची आतषबाजी या प्रयोगात अखंड सुरू राहते.हा प्रयोग एकट्याच्या खांद्यावर पेलून नेण्याचा मोठा आत्मविश्वास संजीवन म्हात्रे यांच्याकडे असल्याचे या सादरीकरणात स्पष्ट होते. स्टॅण्ड-अप कॉमेडीसदृश हा प्रयोग असला, तरी रंगमंचावर या रंगकर्मीचे नॉनस्टॉप वावरणे या प्रयोगाला एकसुरीपणाच्या दोषापासून बरेच दूर नेते. संपूर्ण रंगमंचभर त्यांचा सुरू असलेला वावर अजिबात कंटाळा येऊ देत नाही. प्रयोग अनुभवताना त्यांचा प्रचंड स्टॅमिना सहज लक्षात येतो. त्यांच्या संगीत साथीदारांचेही मोठे योगदान या प्रयोगाला आहे. या रंगकर्मीकडे अजून बरेच काही सांगण्यासारखे आहे; परंतु वेळेच्या मर्यादेत ते सगळे मांडून होत नाही, असा अनुभवही हा प्रयोग देतो.हा प्रयोग मराठी भाषेत सादर होत असतानाच त्याला आगरी बोलीभाषेचा दिलेला तडका धमाल आणतो. यामुळे सादरीकरणात वेगळेपणा तर येतोच; परंतु त्याचबरोबर वेगळ्या भाषेचा सूरही कानांवर पडतो. त्यामुळे त्यातली लज्जत अजून वाढते. मुलांचे शिक्षण, प्रेमाची बदललेली परिभाषा, विवाह सोहळ्यातला सावळागोंधळ, आईची ममता, घरातून मुलांवर होणारे संस्कार, कॉलेजातले प्रश्न, गावखेड्यातले विषय, शहरी भागातले आधुनिकीकरण, महागाई, चंगळवाद या आणि अशा विविध विषयांना हाताशी धरून केलेले साभिनय सादरीकरण हा या प्रयोगाचा गाभा आहे. संजीवन म्हात्रे यांनी पूर्ण ताकद पणाला लावून हे मुद्दे यात मांडले आहेत. शिवरायांची महती हा तर या प्रयोगाचा कळस म्हणावा लागेल. वक्तृत्व आणि अभिनयाची योग्य अशी पेरणी असलेला हा प्रयोग म्हणजे आवश्यक तेथे चिमटे घेत, उखाळ्यापाखाळ्या काढत घडवून आणलेली मजेशीर भटकंती आहे.