मराठी टायगर्स चित्रपटाला दोनच दिवसांत प्रचंड प्रतिसाद दिसत आहे. उत्तम कलाकृती, तगडी स्टारकास्ट, आकर्षक मांडणी, खिळवून ठेवणारे पार्श्वसंगीत आणि दमदार संवाद यांच्या जोरावर मराठी टायगर्सने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली शिवा पाटील ही भूमिका लक्ष वेधून घेते. सोबत आशिष विद्यार्थीसारखा कसलेला खलनायक आणि गांधीवादी नेतृत्व करणारे अण्णा म्हणजे विक्रम गोखले यांच्या अभिनयाने चित्रपटाची उंची गाठली जाते. विद्याधर जोशी यांनी साकारलेला कन्नड चाणा चेठ उत्तम. महेश महादेव, किरण शरद, तेजा देवकर, विकास पाटील, अश्विनी एकबोटे या सर्वांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. उत्तम पार्श्वसंगीत आणि सुमधुर संगीत ही आणखी एक जमेची बाजू. ‘‘वाऱ्याची दिशा आणि वाघाची सीमा ठरविता येत नाही’’ ही टॅगलाइन घेऊन आलेला मराठी टायगर्स प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या नक्कीच घेऊन जातो. ‘‘मनाचा नारळ मनानेच फोडायचा असतो’’, ‘‘सीमाप्रश्नाचं बोलत असाल तर कोणाचा बापही मला अडवू शकत नाही’’, ‘‘जे येतील त्यांच्यासोबत आणि जे येणार नाहीत त्यांच्या छाताडावर पाय ठेवून हा लढा असाच सुरू राहील..’’ हे संवाद निश्चितच टाळ्या घेऊन जातात. ‘‘कोणताही लढा नुसता रक्तपात करून जिंकता येत नाही तर त्याला अहिंसेची आणि लोकशाहीची जोड द्यावी लागते’’ हा डोळ्यांत अंजन घालणारा संदेशही लोकांपर्यंत पोहोचतो. एकंदरीतच विषयाची योग्य हाताळणी, कलाकारांचा कसलेला अभिनय आणि पार्श्वसंगीत यांच्या जोरावर ‘मराठी टायगर्स’ला अभूतपूर्व यश मिळत आहे.
‘मराठी टायगर्स’चे अभूतपूर्व यश
By admin | Updated: February 8, 2016 03:09 IST