Join us  

शाहीर शेखने त्याच्या पूर्वप्रेयसीची अशी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 12:49 PM

शाहीर शेखला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. त्याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून त्याच्या या फोटोत आपल्याला त्याच्यासोबत त्याची पूर्वप्रेयसी पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देत्याने अयू टींग टींग सोबत इंडोनेशियामधील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने अयूसोबतचा फोटो पोस्ट करून लिहिले आहे की, आपले मन हे निर्मळ असून आपण आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याची गरज आहे.

कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेतील देव, सोनाक्षी या व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेने शाहीर शेख आणि एरिका फर्नांडिस यांना रातोरात स्टार बनवले. शाहीरने याआधी महाभारत या मालिकेत अर्जुनाची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. शाहीर हा छोट्या पडद्यावरचा एक प्रसिद्ध अभिनेता असून तो सध्या ये रिश्ते है प्यार के या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेतील त्याच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

शाहीर शेखला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. त्याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून त्याच्या या फोटोत आपल्याला त्याच्यासोबत त्याची पूर्वप्रेयसी पाहायला मिळत आहे. त्याने अयू टींग टींग या त्याच्या पूर्वप्रेयसीची सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली आहे. 

शाहीर हा भारताप्रमाणेच अनेक इंडोनियामधील मालिकेत देखील काम करतो. इंडोनेशिया मध्ये देखील त्याला चांगलीच लोकप्रियता आहे. त्याने अयू टींग टींग सोबत इंडोनेशियामधील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने अयूसोबतचा फोटो पोस्ट करून लिहिले आहे की, आपले मन हे निर्मळ असून आपण आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याची गरज आहे. माफी मागणे आणि माफ करणे हे दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहे. मला माफ केल्याबद्दल मी तुझा ऋणी आहे.

अयू टींग टींगने या पोस्टनंतर मी शाहीरला केव्हाच माफ केले असे म्हटले आहे. अयूच्या आधी शाहीर आणि एरिका यांच्या प्रेमकथेची चर्चा होती. एरिका आणि शाहीर आता मालिकेत एकत्र काम करत नसले तरी आजही ते एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. याचमुळे एरिका आणि शाहीरमध्ये प्रेमप्रकरण सुरू असून ते लवकरच लग्न करणार आहेत अशा बातम्या नेहमीच वाचायला मिळतात. या अफवांना कंटाळून एरिकाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती. तिने म्हटले होते की, आजवर या चर्चांवर मी गप्प राहाणेच पसंत केले होते. पण आता मी विनंती करून सगळ्यांना सांगू इच्छिते, की कोणाच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवताना १०० वेळा विचार करणे गरजेचे आहे. आम्ही दोघे खूप चांगले फ्रेंड्स आहोत. केवळ वर्तमानपत्रांचे रकाने भरण्यासाठी अशाप्रकारच्या बातम्या कोणीही पसरवू नये.

टॅग्स :शाहीर शेख