यशराज फिल्म्सतर्फे बनविण्यात येणारा सलमान खानचा चित्रपट ‘सुलतान’मध्ये अनुष्का शर्मा ही अभिनेत्री असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. काही दिवसांमध्येच हे स्पष्ट होईल. सलमानसोबत अनुष्काचा हा पहिला चित्रपट असेल. कतरिना कैफपासून राणी मुखर्जी, काजोल, माधुरी दीक्षित, प्रीती झिंटा, रवीना टंडन आणि टिष्ट्वंकल खन्ना यांच्याशिवाय करिष्मा आणि करिना यांच्या रांगेत आता अनुष्काही आली आहे. या यादीत त्या नायिकांची नावे आहेत, ज्यांनी तिन्ही खान अभिनेत्यांसमवेत काम केले आहे.अनुष्का शर्माची गोष्ट पाहिली तर ‘रब ने बना दी जोडी’मध्ये तिच्या कारकिर्दीची सुरुवात शाहरूख खानसोबत झाली. नुकत्याच आलेल्या ‘पीके’ चित्रपटात ती आमीरसोबत अभिनेत्री होती. आता ती सुलतानमध्ये सलमानची नायिका बनते आहे. या यादीतील कतरिना कैफनेदेखील अशी कामगिरी केलीय. यशराजच्या तीन चित्रपटांत तीन खानसमवेत तिने काम केलेय. सलमानसोबत ‘एक था टायगर’, शाहरूखसोबत ‘जब तक है जान’, आमीरसोबत ‘धूम थ्री’ या चित्रपटात तिने अभिनेत्री म्हणून काम केले आहे. राणी मुखर्जीनेसुद्धा तीन खानसोबत काम केले आहे. करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’मध्ये शाहरूख खानसोबत, ‘गुलाम’मध्ये आमीर खानसोबत, सलमान खानसोबत ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘हॅलो ब्रदर’, ‘चुपके चुपके’ या चित्रपटात काम केले आहे. काजोलची गोष्ट सांगायचं म्हटलं तर आमीर खानसोबत ‘फना’, सलमानसोबत ‘प्यार किया तो डरना क्या’ आणि शाहरूख खानसोबत तिची जोडी नेहमीच हिट राहिली आहे. कुछ कुछ होता है पासून बाजीगर, कभी खुशी कभी गम, करण अर्जुन असे अनेक चित्रपट तिच्या यादीत आहेत. शाहरूखसोबत ज्या ज्या वेळी तिने काम केले ते सारे चित्रपट हिट ठरले आहेत. प्रीती झिंटादेखील यात मागे नाही. तिच्या करिअरची सुरुवात मणिरत्नमच्या ‘दिल से’ने शाहरूखसोबत झाली. फरहान अख्तरच्या ‘दिल चाहता है’मध्ये आमीरसोबत आणि ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘हर दिल जो प्यार करेगा’मध्ये ती सलमानची नायिका होती. माधुरी दीक्षितनेदेखील या तीनही खानसमवेत काम केले आहे. सलमानसोबत ‘साजन’, आमीर खानसोबत ‘दिल’ आणि शाहरूखसोबत ‘दिल तो पागल है’ पासून कोयलापर्यंतच्या चित्रपटांचा यात समावेश आहे. टिष्ट्वंकल खन्नाचे करिअर खूप मोठे नाही, मात्र तिने तिन्ही खानसमवेत काम केले आहे. ‘मेला’मध्ये आमीर, ‘बादशाह’मध्ये शाहरूख आणि सलमानसोबत ‘जब प्यार किसीसे होता है’मध्ये ती अभिनेत्री म्हणून चमकली. रवीनाने सलमानच्या ‘पत्थर के फुल’पासून पदार्पण केले. ‘अंदाज अपना अपना’मध्ये ती आमीर खानची जोडीदार होती, शाहरूखसोबत ‘जमाना दिवाना’मध्ये ती दिसली. कपूर भगिनींमध्ये करिष्माने आमीरसोबत ‘राजा हिंदुस्तानी’सारखा हिट चित्रपट केला. शाहरूखसोबत ‘दिल तो पागल है’, सलमानसोबत ‘जागृती’, ‘दुल्हन हम ले जाऐंगे’, ‘चल मेरे भाई’मध्ये काम केले. करीना कपूरने ‘बॉडीगार्ड’मध्ये सलमान, ‘थ्री इडियट्स’मध्ये आमीर आणि ‘अशोका‘, ‘रा-वन‘मध्ये शाहरूख खानसोबत काम केले.
- anuj.alankar@lokmat.com