Join us  

तू मेरा हिरो फेम सोनिया बलानी दिसणार डिटेक्टिव्ह दिदी या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 9:55 AM

डिटेक्टिव्ह दिदी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. भारताच्या राजधानीचे शहर असलेल्या दिल्लीची पार्श्वभूमी असलेल्या या मालिकेत विशेष ...

डिटेक्टिव्ह दिदी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. भारताच्या राजधानीचे शहर असलेल्या दिल्लीची पार्श्वभूमी असलेल्या या मालिकेत विशेष एजंट भीम सिंग भुल्लर आणि खाजगी गुप्तहेर बंटीचा प्रवास दाखवला जाणार आहे. गुन्हेगारी केसचा शोध घेत असताना ही जोडी हलकी फुलकी थट्टामस्करी देखील करताना दिसणार आहेत. भीम हा दिल्ली क्राइम ब्रँचचा हसरा आणि खेळकर पोलीस असून तो नियमांच्या आत राहून शोध घेणे पसंत करतो तर बंटी सर्व गोष्टी स्वतःच्या हाती घेते. कारण तिचा पोलिसांच्या क्षमतेवर विश्वास नाहीये. सर्वात आधी केस कोण सोडवतो या शर्यतीत भीम आणि बंटी नेहमीच असतात. त्यांच्या कामात ते प्रचंड तरबेज आहेत. ते एकच केस सोडविताना वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. पण जरी त्यांच्या कामाच्या पद्धतीत वेगळेपणा असला तरी बंटी आणि भीम दोघेही एक युनिट असल्याप्रमाणे एकत्र काम करतात आणि त्याचमुळे केस सोडविण्यात त्यांना यश सहज मिळते. डिटेक्टिव्ह दिदीचे चित्रीकरण दिल्लीतील विविध भागांमध्ये करण्यात अाले आहे. बंटी शर्माचे डायनॅमिक पात्र अभिनेत्री सोनिया बलानीने रंगविले आहे तर मनिष गोपलानीने भीम सिंग भुल्लरची भूमिका साकारली आहे. आपल्या भूमिकेविषयी सोनिया बलानी सांगते, बंटीचे पात्र खूपच चांगल्या पद्धतीने लिहिण्यात आलेले आहे. अशा प्रकारची भूमिका मी प्रथमच साकारत आहे. या भूमिकेसाठी मी खूप उत्सुक असून ही भूमिका अतिशय आव्हानात्मक देखील आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर पळत पळत अॅक्शन सीन चित्रीत करणे हा अतिशय रोमांचकारी अनुभव होता. या मालिकेतील बंटी ही व्यक्तिरेखा नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवण्यात येणार आहे. बंटी ही व्यक्तिरेखा आधुनिक महिलांचे प्रतिनिधित्व करत असल्याने मी ही मालिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या शो मध्ये काम करताना मला खूप आनंद होत आहे. प्रेक्षक माझ्या या नव्या भूमिकेची प्रशंसा करतील, त्यांना माझी ही भूमिका नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.